India vs England 2nd ODI Live Updates : इंग्लंडच्या २४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. रोहित शर्मा, रिषभ पंत हे भोपळाही फोडू शकले नाही, तर शिखर धवन ९ धावा करून माघारी परतला. पाच महिन्यांनंतर वन डे खेळत असलेल्या विराट कोहली ( Virat Kohli) याच्याकडून अपेक्षा होत्या. त्याने सुरुवातही दमदार केली. मिड ऑन, मिड ऑफ व कव्हर ड्राईव्ह असे तीन चौकार खेचताच त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.. पण, २५ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने तो १६ धावांवर माघारी परतला. भारताचे ४ फलंदाज ३१ धावांत बाद झाले. विराटची विकेट पडताच एक ट्विट वाऱ्यासारखे व्हायरल झाले. त्यात विराट २५ चेंडूंत १६ धावा करणार असा दावा केला गेला होता आणि तोही भारताचा डाव सुरू होण्याआधीच अन् तसेच घडल्याने सर्वांना धक्का बसला.
रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीला इंग्लंडच्या गोलंदाजांनी मोकळेपणाने फटके मारू दिले नाही. २५ चेंडूनंतर भारताने बॅटीतून पहिली धाव मिळवली आणि तिही विराट कोहलीच्या चौकाराने ती आली. रोहित १० चेंडूंत एकही धाव न करता रिसे टॉप्लीच्या गोलंदाजीवर LBW झाला. त्यानंतर विराटने मिड ऑन, मिड ऑफ व कव्हर ड्राईव्ह असे चौकार खेचून उपस्थितांची दाद मिळवली. दुसऱ्या बाजूने धवन चाचपडत खेळत होता. ९व्या षटकात टॉप्लीच्या गोलंदाजीवर धवन ( ९) यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. भारताला २७ धावांत दुसरा धक्का बसला. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव येणे अपेक्षित होते, परंतु रिषभ पंतला वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले. पण, ५ चेंडू खेळून पंत भोपळ्यावर बाद झाला. ब्रायडन कार्सच्या फुलटॉसवर पंत झेलबाद झाला. भारताने २९ धावांत ३ फलंदाज गमावले. डेव्हिड विलिने विराटला ( १६) बाद करून भारताला चौथा धक्का दिला.