India vs England 2nd ODI Live Updates : भारताने पहिल्या वन डे सामन्यात सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने आजचा वन डे सामना जिंकल्यास मागील ७ वर्षांतील इंग्लंडमधील भारताचा हा पहिला वन डे मालिका विजय असेल. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजांनी पुन्हा एकदा त्याचा निर्णय योग्य ठरवलेला पाहायला मिळतोय. युदवेंद्र चहलने ३ विकेट्स घेत इंग्लंडला धक्के दिले. चहलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा मोह बेन स्टोक्सला महागात पडला अन् इंग्लंडचा निम्मा संघ २१ षटकांतच माघारी परतला.
विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये परतल्यामुळे श्रेयस अय्यरला विश्रांती दिली गेली आहे. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध खेळ सुरू ठेवला होता, परंतु हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) त्याच्या पहिल्याच षटकात रॉयला ( २३) बाद केले व इंग्लंडला ४१ धावांवर पहिला धक्का दिला. बेअरस्टो दुसऱ्या बाजूने चांगले फटके मारताना दिसला. त्याने १४व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोंलदाजीवर मारलेले दोन पुल शॉट सीमापार केले. बेअरस्टो हळुहळू धावांचा वेग वाढवत असताना १५व्या षटकात युजवेंद्र चहलने इंग्लंडला मोठा धक्का दिला. ३८ चेंडूंत ६ चौकारांसह ३८ धावा करणाऱ्या बेअरस्टोचा त्याने त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्या षटकात चहलने इंग्लंडच्या जो रूटला ( ११) फिरकीच्या जाळ्यात अडकवून LBW केले. रूटने घेतलेला DRS वाया गेला.
मोहम्मद शमीने इंग्लंडला चौथा धक्का देताना जोस बटलरचा ( ४) त्रिफळा उडवला. इंग्लंडचे चार फलंदाज ८७ धावांवर माघारी परतले. हा सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकर व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हेही उपस्थित होते. सचिन व गांगुली यांना सोबत पाहून स्टेडियमवर जल्लोष झाला. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना हेही लॉर्ड्सवर दिसले. बेन स्टोक्सने चहलला चांगले रिव्हर्स स्वीप मारले, परंतु भारतीय गोलंदाजाने त्याला चकवले. स्टोक्स २१ धावांवर LBW झाला अन् इंग्लंडला १०२ धावांवर पाचवा धक्का बसला.