India vs England 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या वन डे सामन्यातही उत्तम कामगिरी करताना इंग्लंडला २४६ धावांत गुंडाळले. फिरकीपटू युजवेंद्र चहलने ४७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांनीही चांगली कामगिरी केली. पण, एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma injury) क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती आणि त्याने मैदान सोडले होते. त्यामुळे तो फलंदाजीता येतो की नाही याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
जेसन रॉय ( २३) व जॉनी बेअरस्टो ( ३८) या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली, परंतु हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. त्यानंतर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी फारकाळ खेळपट्टीवर टीकू दिले नाही. जो रूट ( ११), बेन स्टोक्स ( २१), जोस बटलर ( ४) हे झटपट माघारी परतले. चहलने इंग्लंडच्या बेअरस्टो, रूट, स्टोक्स व मोईन अली या प्रमुख फलंदाजांना बाद केले. लिएम लिव्हिंगस्टोन ( ३३) व मोईन अली यांनी ४६ धावांची भागीदारी करून डाव सारवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. अलीने त्यानंतर डेव्हिड विलिसह संघर्ष करताना संघाला दोनशेपार नेले. अलीने ६४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. विलि ४१ धावांवर बाद झाला.
मोहम्मद शमीने ४८ धावांत १, हार्दिक पांड्याने २८ धावांत २ विकेट घेतल्या. चहलने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने अखेरची विकेट घेताना इंग्लंडचा संघ २४६ धावांत माघारी पाठवला. बुमराहच्या नावावर दोन विकेट्स राहिल्या. प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. भारताला ७ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकण्यासाठी २४७ धावा करायच्या आहेत. क्षेत्ररक्षण करताना रोहितचा हात दुखावला होता आणि काही काळ तो मैदानाबाहेर गेला होता. उप कर्णधार शिखर धवनने त्यावेळेस सामन्याची धुरा सांभाळली होती. काही षटकांनंतर रोहित पुन्हा मैदानावर दिसला, परंतु त्याचा हात कितपत बरा झाला आहे हे तो फलंदाजीला आल्यावरच समजेल.