India vs England 2nd ODI Live Updates : रिसे टॉप्ली ( Reece Topley) याने आज भारतीय फलंदाजांची शाळा घेतली. रोहित शर्मा, शिखर धवन, सूर्यकुमार यादव व रवींद्र जडेजा या चार फलंदाजाना त्याने माघारी पाठवले. इंग्लंडच्या २४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. निम्मा संघ ७३ धावांवर माघारी परतल्याने भारत अर्धी लढाई तेथेच हरला होता. तरीही हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांच्याकडून आशा होत्या. मात्र, धावा व चेंडू यांच्यातली दरी एवढी वाढली की तेही हतबल झाले. इंग्लंडने दुसरी वन डे जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. टॉप्लीने २४ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या.
रोहित शर्मा, रिषभ पंत हे भोपळाही फोडू शकले नाही, तर शिखर धवन ९ धावा करून माघारी परतला. पाच महिन्यांनंतर वन डे खेळत असलेल्या विराट कोहली ( Virat Kohli) याच्याकडून अपेक्षा होत्या. त्याने सुरुवातही दमदार केली. मिड ऑन, मिड ऑफ व कव्हर ड्राईव्ह असे तीन चौकार खेचताच त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.. पण, २५ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने तो १६ धावांवर माघारी परतला. धवनची विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव येणे अपेक्षित होते, परंतु रिषभ पंतला वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले. पण, ५ चेंडू खेळून पंत भोपळ्यावर बाद झाला. ब्रायडन कार्सच्या फुलटॉसवर पंत झेलबाद झाला. हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव यांनी ४२ धावांची भागीदारी करून टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकला टॉप्लीने विकेट मिळवली. कट मारण्याच्या प्रयत्नात सूर्या ( २७) त्रिफळाचीत झाला. हार्दिक खिंड लढवत होता आणि त्याला रवींद्र जडेजाची साथही मिळत होती. पण, धावा व चेंडू यांच्यातली दरी इतकी वाढली की आक्रमणाशिवाय पर्याय उरला नाही. त्याच प्रयत्नात हार्दिक ( २९) मोईन अलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. आता जडेजा एकमेव फलंदाज खेळपट्टीवर होता. मोहम्मद शमीने काळाची गरज लक्षात घेता धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. जडेजाकडेही दुसरा पर्याय नव्हता आणि तोही विकेट टिकवून फटकेबाजी करत होता. या दोघांची ३९ धावांची भागीदारी टॉप्लीनेच तोडली. शमी २३ धावांवर बाद झाला. त्यानंतर लिएम लिव्हिंगस्टोनने भारताला मोठा धक्का देताना जडेजाचा ( २९) त्रिफळा उडवला. टॉपलीने त्याच्या अखेरच्या षटकात युजवेंद्र चहलचा ( ३) त्रिफळा उडवून सामन्यातील पाचवी विकेट घेतली. लॉर्ड्सवर वन डे त पाच विकेट घेणारा तो इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला. अखेरची विकेट घेत टॉप्लीने भारताचा डाव १४६ धावांवर गुंडाळून इंग्लंडला १०० धावांनी विजय मिळवून दिला. इंग्लंडने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
युजवेंद्र चहलच्या विक्रमी कामगिरीवर पाणी!जेसन रॉय ( २३) व जॉनी बेअरस्टो ( ३८) या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली, परंतु हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. . जो रूट ( ११), बेन स्टोक्स ( २१), जोस बटलर ( ४) हे झटपट माघारी परतले. चहलने इंग्लंडच्या बेअरस्टो, रूट, स्टोक्स व मोईन अली या प्रमुख फलंदाजांना बाद केले आणि ४७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. लॉर्ड्स वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. १९८३मध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. लिएम लिव्हिंगस्टोन ( ३३) व मोईन अली यांनी ४६ धावांची भागीदारी करून डाव सारवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. अलीने त्यानंतर डेव्हिड विलिसह संघर्ष करताना संघाला दोनशेपार नेले. अलीने ६४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. विलि ४१ धावांवर बाद झाला. मोहम्मद शमी ( १- ४८), हार्दिक पांड्या ( २- २८), जसप्रीत बुमराह ( २-२८), प्रसिद्ध कृष्णा ( १-५३) यांनी चांगली गोलंदाजी केली.