India vs England 2nd ODI Live Updates : इंग्लंडविरुद्धची दुसरी वन डे युजवेंद्र चहलने गाजवली. त्याने १० षटकांत ४७ धावांत ४ विकेट्स घेत १९८३ सालचा मोठा विक्रम मोडला. लॉर्ड्सवरील वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. त्याने १९८३ साली नोंदवला गेलेला विक्रम मोडला. मोहिंदर अमरनाथ यांनी १९८३मध्ये १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या आणि ती लॉर्ड्सवरील भारतीय गोलंदाजाची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. इंग्लंडकडून मोईन अली व डेव्हिड विली यांनी संघर्ष करताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांनीही चांगली गोलंदाजी केली.
जेसन रॉय ( २३) व जॉनी बेअरस्टो ( ३८) या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली, परंतु हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. त्यानंतर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी फारकाळ खेळपट्टीवर टीकू दिले नाही. जो रूट ( ११), बेन स्टोक्स ( २१), जोस बटलर ( ४) हे झटपट माघारी परतले. चहलने इंग्लंडच्या बेअरस्टो, रूट, स्टोक्स व मोईन अली या प्रमुख फलंदाजांना बाद केले. लिएम लिव्हिंगस्टोन ( ३३) व मोईन अली यांनी ४६ धावांची भागीदारी करून डाव सारवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. अलीने त्यानंतर डेव्हिड विलिसह संघर्ष करताना संघाला दोनशेपार नेले. अलीने ६४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. विलि ४१ धावांवर बाद झाला.
मोहम्मद शमीने ४८ धावांत १, हार्दिक पांड्याने २८ धावांत २ विकेट घेतल्या. चहलने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने अखेरची विकेट घेताना इंग्लंडचा संघ २४६ धावांत माघारी पाठवला. बुमराहच्या नावावर दोन विकेट्स राहिल्या. प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. भारताला ७ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकण्यासाठी २४७ धावा करायच्या आहेत.