Join us  

IND vs ENG, 2nd ODI: सूर्यकुमार यादव करणार पदार्पण?; भारताला इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाची संधी 

India vs England, 2nd ODI : दुसरा एकदिवसीय सामना आज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 9:04 AM

Open in App

India vs England, 2nd ODI : कसोटी मालिकेसह टी-२० मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत भारतानेइंग्लंडविरुद्ध दोन्ही मालिका जिंकल्या. मात्र तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने दमदार सुरुवात केली आणि आता शुक्रवारी होणारा दुसरा सामना जिंकून मालिका विजय निश्चित करण्याची संधी विराट सेनाकडे आहे. यासाठी भारतीयांना पहिल्या सामन्याप्रमाणेच झुंजार आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करावे लागेल. शुक्रवारी बाजी मारल्यास भारताला इंग्लंडविरुद्ध क्लीन स्वीप नोंदवण्याची सुवर्ण संधी मिळेल. 

मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर खांदा दुखावल्याने संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. आगामी आयपीएलमध्येही तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत आता भारतीय संघ टी-२० मालिकेत चमकलेला सूर्यकुमार यादव किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी एकाला संधी देईल, हे निश्चित आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजीत दमदार कामगिरी केलेल्या लोकेश राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी चोख बजावली होती. त्यामुळे मधल्या फळीला आणखी मजबूती देण्यासाठी पंत ऐवजी सूर्यकुमारला संधी मिळण्याची अधिक शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 

सध्या भारताची राखीव फळी अत्यंत मजबूत असून एखादा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यास त्याच्याच तोडीचा दुसरा खेळाडू संघाकडे उपलब्ध असतो. ही चांगली बाब असली, तरी यामुळे संघ निवडताना व्यवस्थापनाची मात्र कसोटी लागत आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा गेल्या तीन महिन्यांपासून संघाबाहेर आहे, मात्र असे असले तरी कसोटीमध्ये अक्षर पटेल, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये कृणाल पांड्या यांनी त्याची कसर भरून काढली. मालिकेतील पहिल्याच सामन्यात पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने छाप पाडत हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह याची कमतरता भासू दिली नाही. 

भारतासाठी सर्वांत मोठा दिलासा दिला तो शिखर धवनने. टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. मात्र, पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार खेळी करत त्याने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. त्याचा साथीदार रोहित शर्माच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे, मात्र तो तंदुरुस्त होईल अशी माहिती मिळत आहे. जर त्याला विश्रांती देण्यात आली, तर धवनसह शुभमन गिल भारताच्या डावाची सुरुवात करेल. गोलंदाजीत भारताची मुख्य मदार भुवनेश्वर कुमार, कृष्णा व शार्दुल ठाकूर यांच्यावरच असेल. 

बटलरकडे आले नेतृत्त्व  

इंग्लंडसाठी मधल्या फळीच्या अपयशाची चिंता असून कर्णधार इयॉन मॉर्गन व सॅम बिलिंग्स यांच्या दुखापतीने अडचण वाढली आहे. मॉर्गन उर्वरीत दोन्ही सामन्यांत खेळणार नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडचे नेतृत्त्व जोस बटलर करेल. बिलिंग्सही शुक्रवारी खेळणार नाही. गुरुवारी थोडावेळ सरव केल्यानंतर मॉर्गनने खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट केले.  मोठी धावसंख्या उभारण्यासाठी किंवा धावांचा पाठलाग करण्यास बेन स्टोक्स, जोस बटलर आणि मोईन अली यांना फॉर्ममध्ये यावे लागेल. गोलंदाजीमध्येही इंग्लंडला अधिक जोर दाखवावा लागेल. 

प्रतिस्पर्धी संघ :

भारत :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ॠषभ पंत, लोकेश राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर. 

इंग्लंड : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम कुरेन, टॉम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, जॅक बॉल, ख्रिस जॉर्डन आणि डेव्हिड मलान.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयभारतइंग्लंड