India vs England 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा सुरुवातीच्या षटकांत इंग्लंडला हादरवले. भुवीच्या दमदार कामगिरीनंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) व युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) यांनी टीम इंडियाला विकेटमागून विकेट मिळवून दिली अन् विजय निश्चित केला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. २०१४नंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका हरलेला नाही. २०१६ ( घरच्या मैदानावर) व २०१८ ( परदेशात) मध्ये भारताने २-१ अशा फरकाने, तर २०२१मध्ये ( घरच्या मैदानावर) ३-२ अशा फरकाने मालिका जिंकली आहे. २०१४मध्ये भारताला ०-१ अशी हार मानावी लागली, तर २०१२ मध्ये १-१असा बरोबरीचा निकाल लागला होता.
रोहित शर्मा व रिषभ पंत यांनी ४९ धावांची भागीदारी केली. पण, बिनबाद ४९ वरून भारताचे पाच फलंदाज ८९ धावांत तंबूत परतले. रोहित ( ३१), विराट कोहली ( १), रिषभ ( २६), सूर्यकुमार यादव ( १५) व हार्दिक पांड्या ( १२) माघारी परतले. रवींद्र जडेजा व दिनेश कार्तिक यांनी टीम इंडियाचा डाव सावरताना ३३ धावांची भागीदारी केली, परंतु जोस बटलरने अनपेक्षितरित्या ही भागीदारी संपुष्टात आणली. जडेजाने अखेरपर्यंत खिंड लढवली. त्याने २९ चेंडूंत नाबाद ४६ धावा केल्या आणि भारताला ८ बाद १७० धावांपर्यंत नेले. रिचर्ड ग्लीसन ( Richard Gleeson) ने पदार्पणात टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले. ग्लीसनने ४-१-१५-३ अशी कामगिरी केली, तर जॉर्डनने ४-०-२७-४ अशी सुरेख कामगिरी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.