India vs England 2nd T20I Live Updates : विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत व रवींद्र जडेजा हे प्रमुख खेळाडू संघात परतल्याने भारतीय संघाची बाजू भक्कम झाली आहे. ५ महिन्यानंतर विराट ट्वेंटी-२०सामन्यात खेळतोय आणि तो रोहित शर्मासह ओपनिंगला येईल अशी अपेक्षा होती. इशान किशन, दीपक हुडा, अक्षर पटेल व अर्षदीप सिंग यांना बाकावर बसावे लागले. पण, रोहितसह फलंदाजी करायला रिषभ पंत ( Rishabh Pant) मैदानावर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रिषभ प्रथमच ट्वेंटी-२०त ओपनिंग करतोय.
इंग्लंडने आजच्या सामन्यात ३४ वर्षीय रिचर्ड ग्लीसन या अष्टपैलू खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत, तर भारताने चार बदल केले आहेत. विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व रिषभ पंत यांची एन्ट्री झाली आहे. इंग्लंडकडून पदार्पण करणारा रिचर्ड हा तिसरा वयस्कर खेळाडू ठरला. पॉल निक्सनने ३६ वर्ष व ८० दिवसांचा असताना पदार्पण केले होते. त्यानंतर डॅरेन गूचने ३४ वर्ष व २६८ दिवसांचे असताना आणि आता रिचर्डने ३४ वर्ष व २१९ दिवसांचा असताना पदार्पण केले आहे.
पहिला सामना जिंकून रोहितने वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला होता. सलग १३ ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा जगातील पहिला कर्णधार ठरला होता. यापूर्वी सलग १२ सामने जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या असघर अफघान व रोमानियाच्या रमेश सथीसन यांच्या नावावर होता. पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखालील हा भारताचा सलग १५ वा विजय ( २ कसोटी) ठरला होता. तसेच पहिल्या सामन्यात हार्दिकने ५१ धावा व ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.