India vs England 2nd T20I Live Updates : भारतीय संघाने आज सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय़ घेताना रोहित शर्मासोबत सलामीला रिषभ पंतला पाठवले. विराट कोहलीचे पुनरागमन झाल्याने तो ओपनिंगला येईल, असा अंदाज सर्वांनीच व्यक्त केला होता. पण, रिषभला पाहून सर्वच चकित झाले. रोहित व रिषभ यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. पण, पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसनने ही भागीदारी तोडताना रोहितला ३१ धावांवर बाद केले.
दरम्यान, रोहित व रिषभ फलंदाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात रिषभ चक्क इंग्लंडच्या खेळाडूला टक्कर मारू का, असा सवाल रोहितला करताना ऐकू येतोय. भारताच्या डावातील पहिल्या षटकात डेव्हिड विलीचा चेंडू रिषभने सहज टोलवला अन् एक धाव घेण्यासाठी पळाला. त्याचवेळी विली त्याच्या मार्गात आल्याचे दिसले. त्यानंतर एक धाव पूर्ण केल्यावर पंत रोहितला म्हणाला, सामने आ गया था, टक्कर मार दू क्या? ( तो समोरच आलेला, टक्कर मारू का त्याला?)
नोव्हेंबर २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करणाऱ्या रिचर्ड ग्लीसन ( Richard Gleeson) याने जुलै २०२२मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानेच टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले. ग्लीसनने ४-१-१५-३ अशी कामगिरी केली, तर जॉर्डनने ४-०-२७-४ अशी सुरेख कामगिरी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली नाही. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रोहित शर्मा व रिषभ पंत यांनी ४९ धावांची भागीदारी केली. पण, बिनबाद ४९ वरून भारताचे पाच फलंदाज ८९ धावांत तंबूत परतले. रोहित ( ३१), विराट कोहली ( १), रिषभ ( २६), सूर्यकुमार यादव ( १५) व हार्दिक पांड्या ( १२) माघारी परतले,
रवींद्र जडेजा व दिनेश कार्तिक यांनी टीम इंडियाचा डाव सावरताना ३३ धावांची भागीदारी केली, परंतु जोस बटलरने अनपेक्षितरित्या ही भागीदारी संपुष्टात आणली. जडेजाने अखेरपर्यंत खिंड लढवली. त्याने २९ चेंडूंत नाबाद ४६ धावा केल्या आणि भारताला ८ बाद १७० धावांपर्यंत नेले.