India vs England 2nd T20I Live Updates : पहिल्या सामन्यातील दणदणीत विजयानंतर भारतीय संघ आज मालिका विजयाच्या निर्धाराने इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पाच महिन्यांनतर विराट कोहली ( Virat Kohli) ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करणार आहे. रिषभ पंत व जसप्रीत बुमराह हेही संघात परतल्याने टीम इंडियाची ताकद आणखी वाढली आहे. पण, आता या तिघांसाठी पहिल्या सामन्यातील कोणत्या तीन खेळाडूंना बाहेर बसावे लागते, याची उत्सुकता आहे.
पहिला सामना जिंकून रोहितने वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला होता. सलग १३ ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा जगातील पहिला कर्णधार ठरला होता. यापूर्वी सलग १२ सामने जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या असघर अफघान व रोमानियाच्या रमेश सथीसन यांच्या नावावर होता. पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखालील हा भारताचा सलग १५ वा विजय ( २ कसोटी) ठरला होता. तसेच पहिल्या सामन्यात हार्दिकने ५१ धावा व ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
कोहली अखेरचा ट्वेंटी-२० सामना फेब्रुवारीत खेळला. गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताची खराब कामगिरी झाली. तेव्हापासून विराट केवळ दोन ट्वेंटी-२० सामने खेळला. त्यातही तो ‘फ्लॉप’ झाला. आयपीएलमध्येही त्याची लौकिकाला साजेशी कामगिरी नव्हती.