Join us  

रोहित शर्माची सराव सत्राला दांडी! भारताच्या फक्त सहा खेळाडूंनी नेटमध्ये गाळला घाम

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभत पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 3:39 PM

Open in App

IND vs ENG 2nd Test ( Marathi News ) : इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभत पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे. पण, या विशाखापट्टणम कसोटीपूर्वी रवींद्र जडेजा व लोकेश राहुल यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्याने भारताचे टेंशन वाढले आहे. सर्फराज खान आणि रजत पाटीदार हे दोन युवा फलंदाज संघात दाखल झाले आहेत, तरीही मनोबल उंचावलेल्या इंग्लंडचा सामना करण्यासाठी यजमानांना चांगली कंबर कसावी लागणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्मावर मोठी जबाबदारी असणार आहे, परंतु आजच्या ऑप्शनल सराव सत्रात रोहितने दांडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

उद्यापासून सुरू होणाऱ्या     दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बुधवारी भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला. पण, आजच्या ऑप्शनल सराव सत्रात केवळ सहा युवा खेळाडू नेटमध्ये सराव करताना दिसले. शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, रजत पाटीदार आणि सौरभ कुमार यांनी आज सराव केला. सर्फराज, पाटीदार व कुमार यांचा दुसऱ्या कसोटीसाठी विराट, लोकेश व रवींद्र जडेजा यांच्याजागी संघात समावेश केला गेला आहे. सराव सत्रादरम्यान सर्फराज व रजत यांच्यात बराच वेळ चर्चाही सुरू असल्याचे दिसले. दरम्यान, फॉर्माशी झगडणारा गिल डावखुऱ्या फिरकीपटूच्या गोलंदाजीवर सराव करताना दिसला.  

“बुधवारी संपूर्ण संघ सरावाला आला होता. आज सकाळी यशस्वी, गिल, सौरभ कुमार, ध्रुव जुरेल, रजत पाटीदार आणि सर्फराज खान  हे केवळ सहा खेळाडू ऑप्शनल सत्रात सरावासाठी आले. अकराव्या स्थानासाठी लढत असलेल्या अनकॅप्ड रजत आणि सर्फराज यांनी नेट दरम्यान दीर्घकाळ गप्पा मारल्या,” असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. 

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माशुभमन गिलयशस्वी जैस्वाल