विशाखापट्टणम - पहिली कसोटी २८ धावांनी गमविल्यानंतर भारतीय संघाला ‘बॅझबॉल’विरुद्ध हुशारीने रणनीतीत बदल करावा लागेल. कारण, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडचे फलंदाज याच पद्धतीचा वापर करणार हे उघड आहे. रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल हे भारताचे प्रमुख खेळाडू जखमी झाल्यामुळे संघाबाहेर आहेत. तीन वर्षांपूर्वी चेन्नईतही संघाला अशाच स्थितीचा सामना करावा लागला होता. इंग्लंडने पहिल्या सामन्यात भारताला नमविले होते. मात्र, भारताने धडाक्यात पुनरागमन करीत मालिका जिंकली होती. ज्यो रूटचा तो संघ वेगळा होता. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील सध्याचा संघ आक्रमक वृत्तीने खेळून कसोटीच्या व्याख्या बदलण्याच्या इराद्याने आला आहे.
इंग्लिश फलंदाज स्विप आणि रिव्हर्स स्विपने भारतीय फिरकीला नामोहरम करीत आहेत. हैदराबादच्या सामन्यात त्यांचा नवव्या-दहाव्या क्रमांकावरील फलंदाजही या दोन फटक्यांचा वापर करीत होता. अशा वेळी दुसऱ्या कसोटीत जडेजाच्या अनुपस्थितीत अश्विनला आणखी सरस कामगिरी करावी लागेल. अक्षर पटेल याच्यापुढे गडी बाद करण्यासह धावा रोखण्याचे आव्हान असेल. जडेजाच्या अनुपस्थितीत कुलदीप यादव खेळू शकतो. शिवाय, जसप्रीत बुमराह हा एकमेव वेगवान गोलंदाज अंतिम संघात असेल का, याकडे लक्ष आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय फलंदाजांना प्रतिस्पर्धी संघातील नवखा फिरकीपटू टॉम हार्टले याने फार त्रस्त केले. त्याच्यापुढे केवळ रोहित आत्मविश्वासाने खेळला, तर शुभमन गिलने निराश केले. त्याला अतिबचावात्मक वृत्तीचा फटका बसला.
तिसऱ्या कसोटीत विराट कोहली परतणार असल्यामुळे येथे गिल आणि श्रेयस यांच्यावर दमदार कामगिरीचे दडपण असेल. लोकेश राहुलचे स्थान रजत पाटीदार घेऊ शकतो. स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या सरफराज खानलादेखील पदार्पणाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे इंग्लंड २-० अशी आघाडी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. बेन स्टोक्स याने उत्कृष्ट नेतृत्वाचा परिचय देत उपलब्ध ताकदीचा पुरेपूर वापर केला. युवा हार्टलीला अतिरिक्त स्पेल सोपविणे हा मास्टरस्ट्रोक्स ठरला. अनुभवी जॅक लीचची दुखापत हा मात्र संघाच्या चिंतेचा विषय ठरावा. युवा ऑफ स्पिनर शोएब बशीर या सामन्याद्वारे पदार्पण करू शकतो. पहिल्या सामन्यात मार्क वूडने निराश केल्यामुळे त्याचे स्थान अनुभवी जेम्स ॲन्डरसन याने घेतले आहे.
योग्य डावपेचांसह खेळणे आणि कामगिरीत शिस्त राखण्याची गरज असेल. उत्कृष्ट रणनीतीचा अवलंब करून कुठलीही चूक होणार नाही, यावर आम्ही भर देणार आहोत.- राहुल द्रविड, मुख्य प्रशिक्षक
आक्रमकता रोखण्याची आमच्याकडे योजना : भरतकाही प्रमुख खेळाडू जखमी असले, तरी आमच्या गोटात अस्वस्थता पसरलेली नाही. इंग्लंडच्या आक्रमक वृत्तीला शह देण्याची योजना आमच्याकडे तयार असून, गरजेनुसार स्विप शॉट रोखले जातील, असे यष्टिरक्षक फलंदाज के. एस. भरत याने सांगितले.३० वर्षांच्या भरतचे हे स्थानिक मैदान आहे. पहिल्या सामन्यातील उणिवांवर तोडगा शोधल्याचा दावा करीत तो पुढे म्हणाला, ‘‘चांगल्या फलंदाजीचे श्रेय इंग्लिश फलंदाजांना द्यायला हवे. परंतु, त्यांना रोखण्याची रणनीती तयार केली आहे.’’भारतीय फलंदाज बरेचदा स्विप शॉट खेळत नाहीत. पण, सरावादरम्यान या शॉटचा वापर होताना दिसला. याचा अर्थ, भारतीय फलंदाजदेखील स्क्वेअर ऑफ विकेट खेळतील, असा आहे. सांघिक खेळीची गरज असेल त्यावेळी आम्ही निश्चितपणे असाच खेळ करणार आहोत, असे भरतने सांगितले.
ॲन्डरसनचा समावेश, बशीरचेही पदार्पण१८३ कसोटींत ६९० बळी घेणारा ४१ वर्षांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स ॲन्डरसन हा दुसरी कसोटी खेळणार आहे. भारताविरूद्ध त्याने ३५ कसोटींत १३९ बळी घेतले, तर भारताच्या भूमीत १३ कसोटींत त्याचे ३४ बळी आहेत. २००६ पासून त्याचा हा सहावा भारत दौरा असेल. जखमी डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचच्या जागी २० वर्षांचा ऑफस्पिनर शोएब बशीर पदार्पण करेल. इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, ओली पोप, ज्यो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स (यष्टिरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स ॲन्डरसन.
जडेजा, शमी उर्वरित मालिकेतून बाहेर?विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-१ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला आणखी काही धक्के बसू शकतात. कारण, क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, अष्टपैलू रवींद्र जडेजाला हॅमस्ट्रिंग दुखापतीतून सावरण्यासाठी ४ ते ८ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. तसेच, वन-डे विश्वचषकापासून घोट्याच्या दुखापतीमुळे बाहेर असलेल्या मोहम्मद शमीचे पुनरागमन जवळपास लांबणीवर पडले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शमी सध्या लंडनमध्ये आहे. त्याच्या घोट्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्याची सध्यातरी आवश्यकता नसली तरी त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच इतर उपचार सुरू असल्याने तोसुद्धा या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नसेल. शमी इंडियन प्रीमिअर लीगमधून पुनरागमन करण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे लोकेश राहुल मात्र तिसऱ्या कसोटीआधी पूर्ण तंदुरुस्त झालेला असेल.