IND vs ENG, 2nd Test ( Marathi News) : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने हैदराबाद कसोटीत २८ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा संघ २०१२ नंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि पहिल्या कसोटीतील विजयाने त्यांचा आत्मविश्वास नक्की उंचावला आहे. ऑली पोपची १९६ धावांची खेळी आणि पदार्पणवीर टॉम हार्टलीने घेतलेल्या ७ विकेट्स, या हैदराबाद कसोटीला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. त्यात आता इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी अनुभवी गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले आहे आणि त्याचवेळी २० वर्षीय गोलंदाजाला पदार्पणाची संधी दिली आहे.
भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात १९० धावांची आघाडी घेतली होती. पण, ऑली पोपने १९६ धावांची शानदार खेळी करून इंग्लंडला चारशेपार नेले आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर हार्टलीने भारतीय फलंदाजांना नाचवले. त्याने ७ विकेट्स घेऊन भारताचा दुसरा डाव २०२ धावांवर गुंडाळला आणि २८ धावांनी संघाला विजय मिळवून दिला. आता इंग्लंड दुसऱ्या कसोटीतही त्याच रणनीतीने मैदानावर उतरणार आहे.
इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू जॅक लिच याला पहिल्या कसोटीत दुखापत झाली होती, तरीही त्याने गोलंदाजी केली व फलंदाजीलाही आला होता. पण, दुसऱ्या कसोटीतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याजागी संघात २० वर्षीय गोलंदाज शोएब बशीर ( Shoaib Bashir ) याचा समावेश केला गेला आहे. व्हिसा कारणास्तव बशीरला पहिल्या कसोटीत खेळता आले नव्हते. पण, आता तो विशाखापट्टणम कसोटीतून पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. त्याचवेळी इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक ६९० विकेट्स घेणारा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन ( James Anderson) याची मार्क वूडच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली गेली आहे.
इंग्लंडचा संघ - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन