Join us

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचं वाढलं टेन्शन, जो रूटच्या फलंदाजीबाबत सस्पेंस

Ind Vs Eng 2nd Test: चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला असून, संघातील दिग्गज फलंदाज जो रूट याला झालेल्या दुखापतीनं पाहुण्या संघाचं टेन्शन वाढवलं आहे. तसेच त्याच्या फलंदाजीस येण्याबाबत संभ्रम वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 07:11 IST

Open in App

विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने आक्रमक सुरुवात करत १ बाद ६७ धावांपर्यंत मजल मारली आहे. आता इंग्लंडला विजयासाठी ३३२ धावांची गरज आहे. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला असून, संघातील दिग्गज फलंदाज जो रूट याला झालेल्या दुखापतीनं पाहुण्या संघाचं टेन्शन वाढवलं आहे. तसेच त्याच्या फलंदाजीस येण्याबाबत संभ्रम वाढला आहे.

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावादरम्यान, क्षेत्ररक्षण करताना जो रूटला दुखापत झाली होती. उजव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीनंतर रुट मैदानाबाहेर गेला. त्यानंतर भारताचा डाव संपेपर्यंत पुन्हा मैदानात परतला नाही. त्यामुळे मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना रूट येणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर इंग्लंडचा ज्येष्ठ कसोटीपटू जेम्स अँडरसननं दिलं आहे. 

अँडरसन म्हणाला की, क्षेत्ररक्षण करताना जो रूटला झालेली दुखापत अधिक गंभीर होऊ नये म्हणून त्याला मैदानाबाहेर ठेवण्यात आले होते. अद्याप त्याचं बोट पूर्णपणे बरं झालेलं नाही. त्याआधी ट्रेनिंगदरम्यानही त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. तर खेळावेळी त्याचं बोट पुन्हा दुखापतग्रस्त झालं. आता चौथ्या दिवशी रूट फलंदाजीस येईल, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. मात्र चिंता करण्याचं काही कारण नाही.  केवळ त्याला फलंदाजीस तयार करण्याचं काम आम्हाला करावं लागेल. कुठल्याही परिस्थितीत फलंदाजी करून संघाची मदत करण्याची जो रूटची इच्छा आहे. आम्हाला फलंदाजीमध्ये त्याची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत त्याला फलंदाजीसाठी तयार केलं जात आहे.  

दरम्यान, भारतीय संघाने शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात २५५ धावांपर्यंत मजल मारली. त्याबरोबरच ३९८ धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने १ बाद ६७ धावांपर्यंत मजल मारली आहे.   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटजेम्स अँडरसन