Virat Kohli Team India, IND vs ENG 2nd Test: भारतीय संघाला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरूद्ध पराभवाचा धक्का बसला. फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघाने पहिले दोन दिवस अधिराज्य गाजवले. पण नंतर अचानक सामना फिरला. आधी ओली पोपने १९६ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर फिरकीपटू हार्टलीने चांगली गोलंदाजी करत एकाच डावात ७ बळी घेतले. त्यामुळे पहिल्या कसोटीचा निकाल भारताच्या विरोधात गेला. तशातच दुसऱ्या कसोटीतही विराट कोहली खेळणार नाही. अशा परिस्थितीत माजी भारतीय क्रिकेटपटूने विराटसंदर्भात एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे.
"सध्या भारतीय संघ कसोटी क्रिकेट खेळत आहे. यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे तीन फलंदाज सध्या भारताची वरची फळी सांभाळत आहेत. हे तीनही फलंदाज फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात. ते फारशी बचावात्मक फलंदाजी करत नाहीत. गिलचा स्ट्रोक खेळवण्यावर जास्त भर असतो, पण बचावात्मक फलंदाजी करण्यावर त्याला फारसा विश्वास नाही. अशा वेळी नव्या चेंडूने खेळताना संयमी खेळणे आणि चेंडू जुना होइपर्यंत खेळपट्टीवर तग धरणे हे त्यांना जमत नाही. चौथ्या क्रमांकावर खेळणारा श्रेयस अय्यरही आक्रमक फलंदाज आहे. अशा वेळी मला भीती आहे की विराट संघात सामील होईपर्यंत उशीर झालेला नसावा," असे मोहम्मद कैफ म्हणाला.
"विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली होती. पहिल्या सामन्यात भारताला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या कसोटी विराटसोबतच राहुल आणि जाडेजा हे दोन खेळाडूदेखील संघाच्या बाहेर असणार आहेत. त्यामुळे संघात ध्रुव जुरेल किंवा सध्याचा फॉर्म लक्षात घेता सर्फराज खानला संधी दिली जाऊ शकते. राहुल आणि जाडेजा दोघेही नसल्याने भारताची फलंदाजी थोडी कमी प्रभावी ठरू शकेल. कारण अक्षर पटेल हा आठव्या क्रमांकावर खेळेल. जर भारताला बॅटिंगचे सामर्थ्य आणखी वाढवायचे असेल तर मग वॉशिंग्टन सुंदरला संघात घेण्याबाबत चर्चा केली जाऊ शकते. पण या साऱ्या गोंधळात विराट संघात सामील होईपर्यंत खूप उशीर झाला असेल, असे घडायला नको," अशा शब्दात कैफने त्याचे मत मांडले.