Join us  

जसप्रीत बुमराह घेतले ९ बळी, सामनावीरही ठरला, तरीही 'या' बाबतीत ठरला अपयशी!

बुमराहने या कसोटी मालिकेत आतापर्यंत २ सामन्यात घेतले १५ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 4:17 PM

Open in App

Jasprit Bumrah Ind vs Eng 2n Test Live: टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची दुसरी कसोटी जिंकली. भारतीय संघाने हा सामना १०६ धावांनी जिंकला आणि त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली. टीम इंडियाच्या विजयात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलचा मोठा वाटा होता. जैस्वालने पहिल्या डावात द्विशतक झळकावले. तर गिलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. मात्र जसप्रीत बुमराहनेही विजयात अप्रतिम योगदान दिले. या वेगवान गोलंदाजाने सामन्यात ९ विकेट्स घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेतले. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र, या कामगिरी दरम्यान त्याचा एक विक्रम हुकला आणि तीन वर्षांपूर्वी त्याला याच अपयशाचाही सामना करावा लागला होता.

बुमराह कशात अपयशी ठरला?

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध एकूण ९१ धावांत ९ बळी घेतले. हे त्याचे इंग्लंडविरुद्धचे सर्वोत्तम आकडे आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये नॉटिंगहॅम कसोटीत त्याने इंग्लंडविरुद्ध ११० धावांत ९ विकेट घेतल्या होत्या. मात्र, एवढी उत्कृष्ट कामगिरी करूनही तो चेतन शर्माचा मोठा विक्रम मोडू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १० बळी घेण्याचा विक्रम चेतन शर्माच्या नावावर आहे, जो त्याने १९८६ मध्ये एजबॅस्टन कसोटीत केला होता. बुमराह दोनदा या विक्रमाच्या जवळ आला आणि दोन्ही वेळा तो एक विकेटने कमी पडला.

बुमराहच्या भेदक माऱ्याने मिळाला विजय

जैस्वाल आणि गिल यांनी अप्रतिम कामगिरी केली यात शंका नाही पण जसप्रीत बुमराहनेच सामना टीम इंडियाकडे वळवला. बुमराहच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ २५३ धावांत गडगडला. जसप्रीत बुमराहने भारतीय भूमीवर आपल्या यशाचे मुख्य कारण सांगितले. तो म्हणाला की, तो खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार आपला प्लॅन तयार करतो आणि मग त्यानुसार तयारी करतो. त्यामुळेच बुमराहला भारतीय खेळपट्ट्यांवरही यश मिळते. या कसोटी मालिकेत बुमराहने आतापर्यंत २ सामन्यात १५ बळी घेतले आहेत.

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहशुभमन गिलयशस्वी जैस्वाल