India vs England 2nd Test Live Update : यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावून भारताला पहिल्या डावात मजबूत धावसंख्या उभारून दिली. यशस्वीने २०९ धावा केलेल्या असताना भारताच्या एकाही फलंदाजाला ३५ धावाही करता आलेल्या नाही.
रोहित शर्मा ( १४ ) व शुबमन गिल ( ३४ ) हे बाद झाल्यानंतर जैस्वालने खिंड लढवली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह ( २७) १३१ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी व पदार्पणवीर रजत पाटीदार ( ३२) यांनी १२४ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलसह ( २७) त्याने पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. यशस्वीने इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. पहिल्या दिवशी १७९ धावांवर नाबाद राहून यशस्वीने अनेक विक्रम मोडले आणि भारताला ६ बाद ३३६ धावांपर्यंत पोहोचवले होते आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवातही त्याने आक्रमकच केली.
यशस्वी १८३ धावांवर असताना जेम्स अँडरसनने अप्रतिम चेंडूवर LBW ची अपील केली आणि DRS ही घेतला. पण, चेंडू काही सेंटीमीटरच्या अंतराने यष्टींच्या जवळून जात होता आणि त्यामुळे यशस्वी थोडक्यात वाचला. चेंडू थोडा खाली राहिला असता तर इंग्लंडचा DRS यशस्वी झाला असता. पण, यशस्वी या प्रसंगाने डगमगला नाही आणि त्याने द्विशतक झळकावून विक्रम केले. त्याने २९० चेंडूंत १९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २०९ धावांची खेळी साकारली. आर अश्विनने २० धावांचे योगदान दिले. भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपुष्टात आला. भारताला आज केवळ ६० धावा जोडता आल्या. शोएब बशीर, जेम्स अँडरसन व रेहान अहमद यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
द्विशतकवीरांच्या यादीत त्याने सुनील गावसकर आणि विनोद कांबळी यांच्या यादीत स्थान मिळवले. कमी वयात द्विशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तो तिसरा भारतीय ठरला. विनोद कांबळीने २१ वर्षे ३५ दिवसांचा असताना तर सुनील गावसकरने २१ वर्षे २८३ दिवसांचा असताना द्विशतक ठोकले होते. यशस्वी जैस्वालने आज वयाच्या २२ वर्षे ३७ दिवसांचा असताना द्विशतक ठोकत मोठा पराक्रम केला.
Web Title: IND vs ENG 2nd Test Live Marathi Update: Yashasvi Jaiswal scored 209 (290) with 19 fours and 7 sixes; India all out 396
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.