IND vs ENG 2nd Test Live Scorecard ( Marathi News) : भारतीय संघाचा डाव सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने सावरला आहे. रोहित शर्मा ( १४) माघारी परतल्यानंतर शुबमन गिलने आक्रमक खेळ करून ३४ धावा जोडल्या, परंतु इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याचा विकेट मिळवली. अँडरसनची ही भारतातील १४वी कसोटी आहे आणि तो सहाव्यांदा भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. यापूर्वी डेरेक अंडरवूड व व्हीव्ह रिचर्ड्स यांनी भारतात पाहुणे म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. पण, याही पलिकडे अँडरसनने ७२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे आणि तोही भारताचे दिग्गज लाला अमरनाथ यांचा...
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी सावध सुरुवात केली. इंग्लंडने पहिल्या १२ षटकांत ३ फिरकीपटूंना गोलंदाजीला आणले. २० वर्षीय शोएब बशीर याच्या पदार्पणाची फार चर्चा रंगलेली आणि तो काय करू शकतो हे त्याने दाखवून दिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( १४) याला त्याने डाव्या स्लिपमध्ये ऑली पोपच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. भारताला १७.३ षटकांत ४० धावांवर पहिला धक्का बसला. फॉर्मशी संघर्ष करणारा शुबमन गिल सुरुवातीला थोडा चाचपडत खेळला, परंतु त्यानंतर त्याने चांगले फटके मारले. यशस्वीसह त्याने चांगली जोडी जमवली आणि ६७ चेंडूंत ४९ धावा जोडल्या. पण, जेम्स अँडरसनने सूरात दिसलेल्या गिलची विकेट मिळवली. गिलने ४६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या, भारताला ८९ धावांवर दुसरा धक्का बसला. जेम्स अँडरसनने ७ इनिंग्जमध्ये पाचवेळा गिलला बाद केले.
यशस्वी एका बाजूने संयमाने खेळत राहिला आणि त्याने ८९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने १०३ धावांत २ विकेट्स गमावल्या होत्या. यशस्वी व श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरला आहे. दरम्यान, अँडरसन हा भारतात कसोटी खेळणारा सर्वात वयस्कर जलदगती गोलंदाज ठरला आहे. १९५२ मध्ये हा विक्रम लाला अमरनाथ यांनी स्वतःच्या नावावर नोंदवला होता.
भारतात कसोटी खेळणारे वयस्कर जलदगती गोलंदाज४१ वर्ष व १८७ दिवस - जेम्स अँडरसन ( २०२४)४१ वर्ष व ९२ दिवस - लाला अमरनाथ ( १९५२) ३८ वर्ष व ११२ दिवस - राय लिंडवॉल ( १९६०)३७ वर्ष व १२४ दिवस - शुते बॅनजर्जी ( १९४९)३४ वर्ष व २० दिवस - गुलाम गार्ड ( १९६०)