IND vs ENG 2nd Test Live Updates | विशाखापट्टनम: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने येताच चांगल्या धावा कुटल्या. पण नंतर मात्र इंग्लिश संघाचा डाव फसला. प्रथम जसप्रीत बुमराह आणि नंतर कुलदीप यादवने बळी घेत भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन केले. बुमराहने पाच बळी घेऊन पाहुण्या संघाची फलंदाजी मोडीत काढली.
कुलदीप यादवने प्रथम यष्टिरक्षक बेन फोक्सचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर त्याने रेहान अहमदला शुबमन गिलच्या हातात झेलबाद केले. रेहानने १५ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. गिलने सुपरमॅन शैलीत झेल घेत इंग्लंडला मोठा झटका दिला. फलंदाजीत विशेष काही करू न शकणाऱ्या गिलच्या क्षेत्ररक्षणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
भारताच्या पहिल्या डावात गिलची कामगिरी काही विशेष नव्हती. त्याने ४६ चेंडूत ३४ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने ५ चौकार मारले. पहिल्या डावात त्याचा स्ट्राईक रेट ७३.९१ होता. मागील काही कसोटी सामन्यांपासून गिलची बॅट शांत आहे, त्यामुळे त्याच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने २३ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात एकही धाव करता आली नाही. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत २, २६ धावा आणि दुसऱ्या कसोटीत ३६, १० अशा धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीतही गिलची बॅट शांत राहिली. भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. गिलच्या कसोटीतील आकडेवारीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या २२ कसोटींच्या ४० डावांत १०९७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ४ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १२८ एवढी आहे.