Setback to England, IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या क्रिकेट संघाची भारत दौऱ्याची सुरुवात दमदार झाली. फिरकीच्या बळावर मायदेशात स्टार ठरणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडने पराभवाचे पाणी पाजले. पहिल्या कसोटी सामन्यात सुरुवातीच्या दोन दिवसात पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी जोरदार पुनरागमन केले आणि थेट सामना जिंकून भारताला धक्काच दिला. या मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा हे दोन बडे खेळाडू दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी मुकणार आहेत. पण दुखापतीचा फटका फक्त भारतालाच बसलेला नाही, तर इंग्लंडच्या संघालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याही एका स्टार खेळाडूला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माधार घ्यावी लागली आहे.
"पहिल्या कसोटीमध्ये खेळत असताना अनुभवी फिरकीपटू जॅक लीच याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीमुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. पण आम्हाला आशा आहे की त्याची ही दुखापत किरकोळ स्वरूपाची असेल आणि तो फार काळ संघातून बाहेर राहणार नाही. त्याच्या दुखापतीमुळे संघाचे नक्कीच नुकसान होणार आहे. त्याचे आम्हाला वाईटही वाटत आहे. पण आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत आणि त्याला लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी मदत करत आहोत," असे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पत्रकार परिषदेत सांगितले.
फिरकीपटू जॅक लिचच्या जागी पाकिस्तानी वंशाचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरला ( Shoaib Bashir ) संघात संधी मिळणे हे जवळपास निश्चित आहे. "मी बशीरला गोलंदाजी करताना पाहिले आहे. तो ज्या उंचीवरून गोलंदाजी करतो ती शैली आम्हाला उपयोगाची आहे. भारतीय पिचवर त्याच्यासारखा गोलंदाज नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो. त्याची शैली आणि गोलंदाजीतील विविधता भारतीय फलंदाजांना नक्कीच गोंधळात पाडू शकते. जॅक लीचच्या दुखापतीमुळे आमच्या समोर जे प्रश्न उभे राहिले होते, त्यावर बशीर हे सर्वोत्तम उत्तर आहे. आमच्या फिरकीपटूंच्या गटात बशीरचा समावेश होणे ही आमच्यासाठी जमेची बाजू असेल," अशा शब्दांत बेन स्टोक्सने संघाचा दुसऱ्या कसोटीचा प्लॅनही सांगितला.