Yashasvi Jaiswal Double Hundred IND vs ENG 2nd Test Live: इंग्लंडविरूद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच डावात भारतीय संघाचा उदयोन्मुख सलामीवीर यशस्वी जैस्वालने दणदणीत द्विशतक ठोकले. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर या कसोटीतही भारताचे इतर फलंदाज फारसे ठसा उमटवू शकले नाहीत. पण यशस्वी जैस्वालने एक बाजू लावून धरली आणि २९० चेंडूचा सामना करत २०९ धावांची खेळी केली. यासोबतच त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या पराक्रमाशी बरोबरी केली. २००७ साली गांगुलीने पाकिस्तानविरूद्ध द्विशतक ठोकले होते. त्यानंतर पहिल्यांदाच एका डावखुऱ्या भारतीय सलामीवीराने कसोटी द्विशतक ठोकले.
द्विशतकवीरांच्या यादीत त्याने सुनील गावसकर आणि विनोद कांबळी यांच्या यादीत स्थान मिळवले. कमी वयात द्विशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तो तिसरा भारतीय ठरला. विनोद कांबळीने २१ वर्षे ३५ दिवसांचा असताना तर सुनील गावसकरने २१ वर्षे २८३ दिवसांचा असताना द्विशतक ठोकले होते. यशस्वी जैस्वालने आज वयाच्या २२ वर्षे ३७ दिवसांचा असताना द्विशतक ठोकत मोठा पराक्रम केला.
त्याआधी, रोहित शर्मा ( १४ ) व शुबमन गिल ( ३४ ) हे बाद झाल्यानंतर जैस्वालने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह ( २७) १३१ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी व पदार्पणवीर रजत पाटीदार यांनी १२४ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. रजतने ७२ चेंडूंत ३२ धावांची संयमी खेळी केली. अक्षर पटेलसह ( २७) त्याने पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. यशस्वीने साथीदारांना सोबतीला घेऊन चौघांसोबत ४० धावांहून अधिक धावांची भागीदारी करून इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. पहिल्या दिवशी १७९ धावांवर नाबाद राहून यशस्वीने अनेक विक्रम मोडले आणि भारताला ६ बाद ३३६ धावांपर्यंत पोहोचवले होते.
दुसऱ्या दिवसाची सुरुवातही त्याने आक्रमकच केली. रविचंद्रन अश्विनची त्याला साथ मिळाली. पण अश्विन बाद झाल्यावर त्याने धावांची गती अधिक तीव्र केली. यशस्वीने सुरुवातीला षटकार आणि चौकार मारून आपले द्विशतक साजरे केले. त्यानंतर धावा काढण्याच्या प्रयत्नातच तो २०९ धावांवर झेलबाद झाला.