Join us  

IND vs ENG: टीम इंडियात स्थान मिळताच सर्फराजची 'भारी' तयारी; सकाळी ६.३० वाजताच गाठलं मैदान

IND vs ENG Test Series: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:42 PM

Open in App

नवी दिल्ली: इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे काही नव्या चेहऱ्यांना आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली. यातीलच एक नाव म्हणजे मुंबईकर सर्फराज खान. वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि सर्फराज यांना दुसऱ्या सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे. राहुलच्या जागी सर्फराजला भारतीय संघाचे तिकिट मिळाले. टीम इंडियात संधी मिळताच त्याच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान, सर्फराज खानने देखील संघात स्थान मिळताच तयारी सुरू केली आहे. तो सकाळी ६.३० वाजताच सरावासाठी मुंबईतील क्रॉस मैदानावर पोहचला. सकाळी सरावासाठी मैदानात गेलेल्याची झलक त्याने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दाखवली आहे. सर्फराज खान सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. परंतु त्याला संधी मिळू शकलेली नव्हती. राहुल आणि जडेजा यांच्या दुखापतीचा सर्फराजला अप्रत्यक्षपणे फायदाच झाला अन् त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. 

लेकाला संघात स्थान मिळताच वडिलांनी मानले आभारसर्फराज खानला संघात स्थान मिळाल्यानंतर त्याचे वडील नौशाद खान यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले, "आपल्याला सर्वांना कल्पना आहे की, सर्फराजचे नाव आज कसोटी संघात आले आहे. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. विशेषत: मुंबई क्रिकेट असोसिएशन जिथून सर्फराज लहानाचा मोठा झाला. नॅशनल क्रिकेट अकॅडमी जिथून त्याला खूप काही शिकायला मिळाले. बीसीसीआय आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे निवडक आणि चाहत्यांचेही आभार.  मला आशा आहे की तो देशासाठी चांगला खेळेल आणि जेव्हा संघ जिंकेल तेव्हा त्याचे महत्त्वपूर्ण योगदान असेल." 

दुसऱ्या सामन्यांसाठी बदललेला भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि आवेश खान. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ