IND vs ENG Test | विशाखापट्टणम: भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला. पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत भारताने १०६ धावांनी मोठा विजय मिळवला. मागील मोठ्या कालावधीपासून धावांसाठी संघर्ष करत असलेल्या गिलला दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात काही खास करता आले नाही. पण दुसऱ्या डावात शतकी खेळी करून गिलने भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात इंजेक्शन घेऊन खेळलो असल्याचा खुलासा गिलने केला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात गिलने ४६ चेंडूत ३४ धावांची छोटी खेळी केली. पण, यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. टीम इंडिया अडचणीत असताना शुबमनने १४७ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी करून पुनरागमन केले. याशिवाय भारतीय संघातील आपली जागा मजबूत केली. कारण सततच्या फ्लॉप शोमुळे तो संघाबाहेर होण्याच्या स्थितीत होता.
इंजेक्शन घेऊन खेळलो - गिल सामन्यानंतर झहीर खान आणि केविन पीटरसनशी चर्चा करताना गिलने सांगितले की, दुसऱ्या डावात फलंदाजीला येण्यापूर्वी बोटांना मार लागल्याने तो इंजेक्शन घेऊन खेळण्यासाठी आला होता. पण तरीही माझ्या वडिलांनी मला सांगितले की, तू एक मोठी खेळी मिस केली आहेस, यावर मी त्यांना म्हणालो, "पापा, मी तुमच्याशी सहमत आहे. देवाचे आभार मानतो की त्याने आज मला आज हॉटेलमधून बाहेर येऊ दिले." असे गिलने मिश्किलपणे नमूद केले.
भारताची मालिकेत बरोबरी दुसरा कसोटी सामना जिंकून यजमान भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी धावांचा डोंगर उभारला. याला प्रत्युत्तर देताना इंग्लिश संघ आपल्या पहिल्या डावात २५५ धावा करू शकला. भारताने दुसऱ्या डावात २५३ धावा करून मजबूत आघाडी घेतली. पाहुण्या इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांची आवश्यकता होती. पण, इंग्लिश संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या २९२ धावांवर गारद झाला अन् भारताने १०६ धावांनी मोठा विजय मिळवला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ९ बळी घेतले. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेण्यात बुमराहला यश आले.