IND vs ENG Test Series: देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकिट मिळवणारा सर्फराज खान टीम इंडियातून खेळण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सर्फराजला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचे कळते. लोकेश राहुलची दुखापत अद्याप कायम असल्याने युवा खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली.
वृत्तसंस्था 'इंडियन एक्सप्रेस'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज खान पदार्पणाचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थित युवा खेळाडूवर भारताच्या मधल्या फळीची जबाबदारी असेल. दरम्यान, कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर संयम गरजेचा आहे. माझे वडील नेहमी माझा उत्साह वाढवण्याचे काम करतात, त्यांचा माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात मोठा वाटा आहे, असे सर्फराज खानने सांगितले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. आताच्या घडीला पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. तिसरा सामना राजकोट येथे होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हैदराबाद कसोटीत इंग्लिश संघाने भारताचा पराभव केला होता. यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये मोठा विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली.
तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.