भारतीय संघात मुंबईच्या सर्फराज खानची निवड झाली आहे. भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांना दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि दमदार फलंदाज लोकेश राहुल दोघांनीही २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळताना जाडेजाच्या हाताला दुखापत झाली होती, तर राहुलने उजव्या बाजूच्या क्वाड्रिसिप्समध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती.
टीम इंडियात सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना भारताच्या संघात सामील करण्यात आले आहे. सर्फराज खान सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. परंतु त्याला संधी मिळू शकलेली नव्हती. राहुल आणि जडेजा यांच्या दुखापतीचा सर्फराजला अप्रत्यक्षपणे फायदाच झाला. त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय अहमदाबाद येथे १ फेब्रुवारीपासून इंग्लंड लायन्स विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम बहु-दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघात वॉशिंग्टन सुंदर होता, त्याजागी सरांश जैनची निवड करण्यात आली आहे. आवेश खान सध्या मध्य प्रदेश संघासोबत रणजी करंडक स्पर्धा खेळत आहे, पण गरज पडल्यास तोदेखील टीम इंडियात दाखल होईल असेही सांगण्यात आले आहे.
सर्फराज खानला संघात स्थान मिळाल्यानंतर त्याचे वडील नौशाद खान यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले, "आपल्याला सर्वांना कल्पना आहे की, सर्फराजचे नाव आज कसोटी संघात आले आहे. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. विशेषत: मुंबई क्रिकेट असोसिएशन जिथून सर्फराज लहानाचा मोठा झाला. नॅशनल क्रिकेट अकॅडमी जिथून त्याला खूप काही शिकायला मिळाले. बीसीसीआय आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे निवडक आणि चाहत्यांचेही आभार. मला आशा आहे की तो देशासाठी चांगला खेळेल आणि जेव्हा संघ जिंकेल तेव्हा त्याचे महत्त्वपूर्ण योगदान असेल."
दुसऱ्या सामन्यांसाठी बदललेला भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव. , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि आवेश खान.