IND vs ENG 2nd Test, Team India Challenges: हैदराबादमध्ये धक्कादायक पराभव झाल्यानंतर टीम इंडिया सध्या विविध विचारांमध्ये आहे. विराट कोहली अगोदरच दुसऱ्या कसोटीसाठीही अनुपलब्ध आगे. त्यात आता केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा हे देखील दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आणि मालिकेत पुनरागमन करण्यासाठी टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकावी लागेल. त्याचाही दबाव टीम इंडियावर आहे. अशा परिस्थितीत २ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटीआधी भारतासमोर तीन प्रश्न उभे आहेत.
१. फिरकी पिच की सपाट खेळपट्टी?
द्विपक्षीय मालिकेत प्रत्येक यजमान संघाला त्याच्या ताकदीनुसार खेळपट्टी हवी असते. अशा परिस्थितीत टीम इंडियाला टर्निंग ट्रॅक आवडतो, पण मालिकेच्या पहिल्या कसोटीत इंग्लिश फलंदाजांनी ज्याप्रकारे फिरकी गोलंदाजीचा सामना केला, त्यामुळे भारतीय थिंक टँकला पिचबाबत अनेक प्रश्न पडले असतील. इंग्लिश फलंदाजांनी, विशेषत: ओली पोपने अश्विन आणि जडेजासारख्या अनुभवी फिरकीपटूंना दुसऱ्या डावात आपल्या स्वीप आणि रिव्हर्स स्वीपने गप्प केले. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीनेदेखील पदार्पणातच भारतीय फलंदाजांना फिरकीच्या जोरावर गुडघे टेकायला लावले. अशा वेळी पुन्हा फिरकीला पोषक खेळपट्टी असावी की वेगवान गोलंदाजांना फायद्याचे पिच असावे हा प्रश्न सोडवावा लागेल.
२. शुभमन गिल की सर्फराज खान?
भारतीय संघाला पुनरागमन करण्यासाठी काही महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय घ्यावे लागतील. शुभमन गिलचा संघात समावेश करावा का? हा देखील असाच एक निर्णय असू शकतो. भारतीय फलंदाज फिरकीला पोषक खेळपट्टीवर काही वेळा गुडघे टेकतात. तशातच शुभमन गिल हा सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी गेल्या वर्षभरात तो पूर्णपणे नापास झाला आहे. अशा वेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्मात असलेल्या सरफराज खानला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. सर्फराज आक्रमक पद्धतीने फलंदाजी करतो आणि त्याचा फायदा संघाला होऊ शकतो. पण विराट, राहुल आणि जडेजा संघात नसताना तुलनेने अनुभवी खेळाडू संघात असावा, असाही विचार टीम इंडिया करू शकते. त्यामुळे हा प्रश्न सध्या भारताला सोडवावा लागेल.
३. दोन वेगवान गोलंदाज की चार फिरकीपटू?
भारत झालेल्या गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने वेगवान गोलंदाजांचा फारसा वापर केलेला नाही पण जेव्हा संघ निवडीचा प्रश्न येतो तेव्हा भारत दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरतो. हैदराबाद कसोटीतही टीम इंडियाने पारंपरिक विचारसरणीने खेळ केला, पण इंग्लंडने मात्र जोखीम पत्करून संघात अतिरिक्त फिरकीपटू खेळवला. त्यांचा हा निर्णय बऱ्याच अंशी योग्य ठरला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतही चार फिरकीपटूंसोबत मैदानात उतरण्याचा विचार करू शकतो. यावरून दोन दिवसांत तोडगा करावा लागणार आहे.
Web Title: IND vs ENG 2nd Test Team India need to find answers of 3 important questions about spinning track Shubman gill spinners
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.