सध्या भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि लोकेश राहुल अनुपस्थितीत असल्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी याविषयी बरीच चर्चा सुरू आहे. अनुभवी खेळाडूंचे मत आहे की रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीत सलामीऐवजी मधल्या फळीत फलंदाजी करावी. मधल्या फळीत भारताच्या संघात फलंदाजीचा अभाव आहे.
विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने चौथ्या क्रमांकाची जबाबदारी स्वीकारावी, असे माजी क्रिकेटपटू दीप दास गुप्ताने म्हटले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मागील अनेक सामन्यांत चांगली सुरुवात केली आहे, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात २४ आणि दुसऱ्या डावात ३९ धावा केल्या होत्या.
४ फिरकीपटू अन् रोहितला चौथ्या क्रमांकावर खेळवादरम्यान, लोकश राहुलने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकाची जबाबदारी चोखपणे सांभाळली. राहुलने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८६ धावा केल्या. दुसऱ्या डावात राहुलला २२ धावा करता आल्या. मात्र, दुखापतीमुळे राहुल आता दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा भाग नाही. त्यामुळे मधल्या फळीत अनुभवी रोहितनेच खेळायला हवे, असे जाणकारांनीही सांगितले. दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.
दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला सर्फराज खान किंवा रजत पाटीदार यापैकी एकाला पदार्पणाची संधी द्यावी लागेल. याबद्दल दीप दास गुप्ता म्हणाला की, शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी सलामीवीर म्हणून खेळायला हवे. रजत पाटीदार तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. रोहित शर्माने चौथ्या क्रमांकावर, तर श्रेयस अय्यरने पाचव्या क्रमांकावर खेळावे. याशिवाय टीम इंडियाने चार फिरकीपटूंसह मैदानात उतरायला हवे. आर अश्विन आणि अक्षर पटेल व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांना देखील संधी मिळायला हवी.
दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
दुसऱ्या सामन्यांसाठी बदललेला भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि आवेश खान.