लंडन - हैदराबाद येथील पहिल्या कसोटीत झालेला पराभव हा भारतासाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो, कारण इंग्लंडची बॅझबॉल नीती मंद खेळपट्ट्यांवर यशस्वी ठरली, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने व्यक्त केले. इंग्लंडने पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्याचे धोरण अवलंबल्यापासून एकही कसोटी गमावलेली नाही.
पहिल्या कसोटीत ओली पोपच्या १९६ धावांच्या खेळीच्या बळावर त्यांनी भारताला २८ धावांनी पराभूत केले. स्काय स्पोर्ट्ससाठी लिहिलेल्या स्तंभात हुसेन म्हणाला, ‘भारताने पहिल्या डावात ४३६ धावा काढल्या, पण आणखी धावा निघू शकल्या असत्या. इंग्लंडला येथे जिंकणे सोपे नसते हा इतिहास आहे. भारतीय संघ चांगलाच असून, मुसंडी मारू शकतो. पण बॅझबॉल नीती किती परिणामकारक आहे, हे इंग्लंडने सिद्ध केल्यामुळे भारतासाठी हा धोक्याचा इशारा ठरावा. आपल्या खेळण्याच्या पद्धतीवर प्रचंड विश्वास असलेल्या इंग्लिश संघाने बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. कुणी आमच्या संघावर शंका घेत असतील तर ते दुप्पट ताकदीने शंका घेणाऱ्यांना चुकीचे ठरवू शकतात. त्यांच्या जिद्दीला माझा सलाम!’
‘पहिल्या डावात १९० धावांनी माघारल्यानंतरही पोपने जडेजा आणि अश्विन यांचा मारा निष्प्रभ केला. दुसरीकडे पहिल्या डावात संघर्ष करणाऱ्या टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात ७ बळी घेतले. कसोटी पदार्पणात मोठे दडपण असते पण हार्टलीने दडपण झुगारून कामगिरी केली. इंग्लंड संघाने यजमानांवर मानसिक आघाडी घेतल्याचे हे लक्षण म्हणायला हवे,’ असे हुसेनने म्हटले आहे.