IND vs ENG 2nd Test ( Marathi News ) : इंग्लंडच्या संघाने हैदराबाद कसोटीत यजमान भारतावर रोमहर्षक विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पदार्पणवीर टॉम हार्टली ( Tom Hartley ) याने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवले. त्याने सात विकेट्स घेऊन इंग्लंडला २८ धावांनी विजय मिळवून दिला. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या हार्टलीने दुसऱ्या डावात ६२ धावांत ७ बळी टिपले. २३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा भारतीय संघ २०२ धावांवर गारद झाला. आता भारत-इंग्लंड यांच्यातली दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येते सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीतील विजयानंतर इंग्लंडचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला आहे आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी त्यांचा गेम प्लान सांगितला आहे.
''टॉम हार्टलीकडे एकाच प्रथम श्रेणी सामन्याचा अनुभव होता आणि पदार्पणात त्याने कमाल करून दाखवली. त्याच्या मी काहीतरी पाहिले आणि त्याला संधी मिळाल्यास तो छाप पाडेल, असे मला वाटले होते. त्याने आमचा विश्वास योग्य ठरवला. त्या विजयानंतर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना होत्या. पण, हा विजय खेळाडूंचा आत्मविश्वास प्रचंड वाढवणारा ठरला, परंतु अजून ४ सामने खेळायचे आहे आणि अजूनही काही गोष्टींवर काम करायचे आहे. भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल,''असे मॅक्युलम म्हणाला.
त्याने पुढे म्हटले, जेव्हा आम्ही टॉमची निवड केली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचाव्या. पण, हे विसरू नका की थोडकेच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या नॅथन लियॉनला संधी मिळाली आणि त्याने ऑस्ट्रेलियासाठी काय कमाल करून दाखवली. जेव्हा तुम्ही पुरेशी चांगले खेळाडू पाहता आणि परिस्थिती त्यांना अनुकूल असेल तेव्हा त्यांना संधी द्यायला हवी. अशा गोष्टींबद्दल तुम्हाला तुमच्या निर्णयाचे समर्थन करावे लागेल. बेन स्टोक्सने ज्या प्रकारे त्याला हाताळले आणि भारतीय फलंदाजांनी दबावाखाली आणले असतानाही त्याच्यावर विश्वास दाखवला, हे महत्त्वाचे होते. मला वाटले की हे नेतृत्वाचे खरे लक्षण आहे.
व्हिसाच्या समस्येचे निराकरण झाल्यानंतर, ऑफ-स्पिनर शोएब बशीर हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघात सामील झाला आणि मॅक्युलमने संकेत दिले की ते २ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत त्यांचे सर्व चार फिरकीपटू खेळतील. “तो साहजिकच अबुधाबीच्या शिबिरात आमच्यासोबत होता आणि त्याच्या कौशल्याने आम्ही खरोखर प्रभावित झालो आहोत. टॉम हार्टलीसारखा प्रथम श्रेणीचा अनुभव त्याच्याकडे कमी आहे पण त्याचे कौशल्य आम्हाला येथे मदत करू शकेल असे आम्हाला वाटले. तो योग्य वेळी आला. जर खेळपट्टी अधिक वळणारी असेल तर आम्ही सर्व फिरकीपटू खेळण्यास घाबरणार नाही,” असे मॅक्युलमने स्पष्ट केले.