Sourabh Kumar, Team India Test Squad, IND vs ENG : भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावला. भारताने कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांवर वर्चस्व गाजवले होते. पण दुसऱ्या डावात ओली पोपच्या १९६ धावा आणि नंतर चौथ्या डावात हार्टलीचे ७ बळी यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाच्या धक्क्यानंतरच भारताला आणखी दोन मोठे धक्के बसले. रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल या दोघांनीही दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली. त्यांच्या जागी सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार या तिघांना भारताच्या संघात सामील करुन घेत असल्याची घोषणा बीसीसीआयने केली. जाणून घेऊया, यातील नव्या दमाचा चेहरा असलेल्या सौरभ कुमारबद्दल...
कोण आहे सौरभ कुमार?
भारतीय संघात सौरभ कुमारला संधी मिळाली आहे. रवींद्र जाडेजाच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. सौरभ कुमार हा स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. २८ वर्षीय सौरभ हा एक अष्टपैलू खेळाडू असून त्याची सर्वात मोठी ताकद त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी आहे. सौरभ मूळचा उत्तर प्रदेशातील बागपतचा असून त्याचे कुटुंब मेरठमध्ये राहते. सौरभचे वडील ऑल इंडिया रेडिओमध्ये कार्यरत होते. त्याची आई गृहिणी आहे. २०२१ मध्ये सौरभ कुमारने नेहा साबी हिच्याशी लग्न केले.
वयाच्या १६व्या वर्षापासून क्रिकेट
सौरभ वयाच्या १६व्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. २०१४ मध्ये त्याने सर्व्हिसेसच्या संघाकडून रणजी क्रिकेट खेळला. त्यानंतर २०१५ पासून तो उत्तर प्रदेशच्या संघाचा भाग बनला. सौरभ कुमारने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात १,५७२ धावा आणि १९६ बळी घेतले आहेत. ४६ सामन्यात त्याने १६ वेळा एका डावात पाच बळी (5 Wicket Haul in Innings) घेतले आहे. तर सहा वेळा एका सामन्यात १० किंवा त्याहून अधिक बळी (10 Wickets Haul in Match) घेतले आहेत. सौरभची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ३२ धावांत ७ बळी अशी आहे. तर सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ६५ धावांत १४ बळी अशी आहे. फलंदाजी दरम्यानही त्याने २ शतके आणि ८ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १३३ धावा आहे.
सौरभ कुमारची IPL कारकीर्द
सौरभ कुमारला २०१७ साली पुणे सुपर जायंट्स संघाने १० लाखाला विकत घेतले होते, तर २०२१ साली पंजाब किंग्सने २० लाखाच्या किमतीत त्याला संघात दाखल करून घेतले होते. यंदाच्या ऑक्शनमध्ये मात्र त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही.
Web Title: IND vs ENG 2nd Test Who is Sourabh Kumar added to Team India Squad against England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.