India vs England 3rd ODI Live Update : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) व रिषभ पंत ( Rishabh Pant) या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. ४ बाद ७२ अशा अवस्थेत असलेल्या भारतीय संघाला सावरताना या दोघांनी शतकी भागीदारी करून विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले आहे. बेन स्टोक्सने अफलातून झेल घेत हार्दिकच्या अविश्वसनीय खेळीला ब्रेक लावला. पण, त्यानंतरही रिषभची फटकेबाजी सुरूच होती. त्याने वन डेतील पहिले शतक झळकावले. आजच्या शतकापूर्वी ८५ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. ९७ धावांवर रिषभचा झेल सुटला अन् भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये सुटकेचा निश्वास टाकलेला पाहायला मिळाला. रिषभने १०६ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले. रिसे टॉप्लीने पुन्हा एकदा टीम इंडियाला धक्के दिले. त्याने शिखर धवन ( १) , रोहित शर्मा ( १७) व विराट कोहली ( १७) या आघाडीच्या फलंदाजांना ३८ धावांवर माघारी पाठवले. रिषभ पंत व सूर्यकुमार यादव ही जोडी भारताचा डाव सावरतील असे वाटले होते आणि त्यांनी ४९ चेंडूत ३४ धावांची भागीदारीही केली. १६व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर रिषभला स्टम्पिंगमध्ये जीवदान मिळाले, परंतु क्रेग ओव्हर्टनने पुढच्याच षटकात सूर्यकुमारला ( १६) बाद करून इंग्लंडला यश मिळवून दिले. रिषभ व हार्दिक पांड्या सहजतेने धावा करताना दिसल्याने भारतीय चाहत्यांना आशेचा किरण दिसू लागला. हार्दिकने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना रिषभसह शतकी भागीदारी केली. रिषभनेही ४५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक व रिषभ यांची ११५ चेंडूंवरील १३३ धावांची पाचव्या विकेट्सची भागीदारी ब्रेडन कार्सने संपुष्टात आणली. हार्दिक ५५ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला.
इंग्लंडमध्ये वन डे शतक झळकावणारा तो राहुल द्रविड ( १९९९) नंतर दुसरा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला.