India vs England 3rd ODI Live Update : मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर आता इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांत रोहित शर्मा हेही नाव समाविष्ठ झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने ५ विकेट्स व ४७ चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी जिंकली. इंग्लंडमध्ये वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रोहित हा भारताचा पहिलाच कर्णधार आहे. विराट कोहली ( Virat Kohli) वगळता या मालिकेत टीम इंडियातील प्रत्येक सदस्याने हातभार लावला. विराटचा फॉर्म हा BCCI साठी चिंतेचा विषय बनलेला असताना भारताच्या माजी कर्णधारावर त्याचं काहीच दडपण नसल्याचे दिसतेय. भारताच्या विजयी सेलिब्रेशनमध्येही विराट युवा गोलंदाज अर्षदीप सिंगवर शॅम्पेन उडवताना दिसला. याच दरम्यान विराटचा एक फोटो चर्चेत आला आला.
रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नाबाद १२५ धावा आणि हार्दिक पांड्यासह ( Hardik Pandya) १३३ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. हार्दिकने ४ विकेट्स व ७१ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून विजय मिळवताना मालिका २-१ अशी खिशात घातली. ८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली आहे. हार्दिक व रिषभ यांची ११५ चेंडूंवरील १३३ धावांची पाचव्या विकेट्सची भागीदारी ब्रेडन कार्सने संपुष्टात आणली. हार्दिक ५५ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला. रिषभने ११३ चेंडूंत १६ चौकार व २ षटकारांसह नाबाद १२५ धावा केल्या.
या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय संघाला विजयी ट्रॉफी देण्यात आली. कर्णधार रोहित शर्माने ती स्वीकारताच शिखर धवनने त्याच्यावर शॅम्पेन ओतली. त्यानंतर विराट कोहली व रिषभ पंत हेही शॅम्पेन उडवायला लागले. रोहित याची मजा घेत होता, परंतु समोर फोटोग्राफरना त्रास होईल म्हणून त्याने सहकाऱ्यांना थांबण्यास सांगितले. पण, त्यावेळी विराट रोहितच्या समोर उभा राहून दूर समालोचन करत असलेल्या रवी शास्त्री यांना शॅम्पेन ऑफर करताना दिसला. विराट व शास्त्री यांची बाँडिंग सर्वांनाच माहित्येय.. त्यामुळे या फोटोची नेटिझन्स मजा घेत आहेत.