India vs England 3rd ODI Live Update : विराट कोहलीने ( Virat Kohli) वेस्ट इंडिज दौऱ्यावरून घेतलेली विश्रांती ही खरचं योग्य आहे, असे आता वाटले तर नवल नाही. पाच महिन्यांनंतर वन डे व ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या विराटला इंग्लंड दौऱ्यावर काही खास करता आले नाही. त्याचा फॉर्म आज येईल, उद्या येईल, आता येईल... असे करता करता अडीच वर्ष निघून गेली. पण, विराट कोहलीला काही सूर गवसलेला दिसत नाही. इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही वन डे सामन्यांत त्याने ज्या प्रकारे सुरुवात केली होती ती पाहून तो आज धावांचा पाऊस पाडेल, असा भाबडा विश्वास निर्माण झाला होता. पण, पुढच्याच क्षणी त्याने त्याला तडा दिला. आजही तेच झाले. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडण्याचा मोह त्याचा घात करतोय.
दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजी हादरवून सोडणाऱ्या रिसे टॉप्लीने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. शिखर धवन १ धाव करून जेसन रॉयच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितने टॉप्लीच्या चेंडूवर पुल शॉट मारून चौकार मिळवला, परंतु टॉप्लीनेही चतुराई दाखवताना अखेरच्या चेंडूवर रोहितला ( १७) स्लीपमध्ये जो रूटच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. भारताचे दोन्ही सलामीवीर २१ धावांवर टॉप्लीने माघारी पाठवले. टॉप्ली येथेच थांबला नाही, त्याने विराट कोहलीला १७ धावांवर बाद केले.
कोहलीने मागील पाच वन डे सामन्यात ८, १८, ०, १६ व १७ धावा केल्या आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच त्यानं सलग पाच सामन्यांत २० पेक्षा कमी धावा केल्या. २०२२ या कॅलेंडर वर्षात कोहलीची सरासरी ही २५.०५ इतकी राहिली आहे आणि २००८नंतर ( ३१.८०) प्रथमच त्याच्यावर ही नामुष्की ओढावली. ७९ डावांत त्याला शतकावीना रहावे लागले आहे.