लंडन - भारताच्या महिला संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला व्हाईटवॉश दिला आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत मालिका खिशात घातल्यानंतर शनिवारी लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडवर १६ धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखत झुलन गोस्वामीला यादगार निरोप दिला.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. मात्र भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा (०), यास्तिका भाटिया (०), हरमनप्रीत कौर (४) आणि हरलीन देओल (३) या झटपट बाद झाल्याने भारताची अवस्था ४ बाद २९ अशी झाली. त्यानंतर स्मृती मंधाना (५०) आणि दीप्ती शर्मा (नाबाद ६८) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने १६९ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून केथ क्रॉस हिने चार बळी टिपले. तर फ्रेया केम्प आणि इचेलस्टोन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचीही दाणादाण उडाली. रेणुका सिंह हिने भेदक गोलंदाची करत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ७ बाद ६५ अशी झाली होती. त्यानंतर चार्लिन डीन हिने एक बाजू लावून धरत तळाच्या फलंदाजांसह इंग्लंडला सामन्यात कमबॅक करून दिले. इंग्लंडचा संघ चमत्कार घडवणार असे दिसत असतानाच ४४ व्या षटकात दीप्ती शर्माने डीन हिला मांकडिंग पद्धतीने धावबाद करत संघाला १६ धावांनी विजय मिळवून दिला. भारताकडून रेणुका सिंह हिने ४ तर झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स टिपल्या.