India vs England 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवने नॉटिंगहॅमचे स्टेडियम दणाणून सोडले. २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ३ फलंदाज ३१ धावांत माघारी परतले होते. आता सामना काय आपण जिंकत नाही, हीच भावना भारताच्या चाहत्यांमध्ये घर करू लागली होती. पण, सूर्यकुमार आला अन् अखेरपर्यंत टीम इंडियाची खिंड लढवली. त्याने श्रेयस अय्यरसह चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची विक्रमी भागीदारी केली. सूर्याने ४९ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. सूर्याचे आज फटके मंत्रमुग्ध करणारे ठरले. सूर्याने मारलेला प्रत्येक फटका इंग्लंडच्या गोलंदाजांचे खच्चीकरण करत होता. सूर्यकुमार ५५ चेंडूंत १४ चौकार व ६ षटकारांसह ११७ धावांवर माघारी परतला.
रिषभ पंत ( १), विराट कोहली ( ११) व
रोहित शर्मा ( ११) हे माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ३१ अशी झाली होती. पण, सूर्यकुमार यादव व
श्रेयस अय्यर यांनी भारताचा संघर्ष सुरू ठेवला होता. दोघंही चांगले फटके मारताना दिसले. या दोघांमुळे भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या. सूर्याने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे स्वीप फटके लाजवाब होते. लिव्हिंगस्टोनने टाकलेल्या १३व्या षटकात सूर्याने २१ धावा चोपल्या. सूर्या आज इंग्लंडच्या कोणत्याच गोलंदाजाला जुमानत नव्हता. त्याहे वाकडे तिकडे दिसणारे, परंतु परफेक्ट फटके चेंडूला अलगद सीमापार पोचवत होते. श्रेयस दुसऱ्या बाजूने सूर्याच्या फटकेबाजीचा आनंद घेताना दिसला.
श्रेयस व सूर्याने ५५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. भारताला अखेरच्या ६ षटकांत ८४ धावा करायच्या होत्या. आजच्या सामन्यात बहारदार कामगिरी करणाऱ्या टॉपलीला गोलंदाजीला आणले आणि त्याने हा विश्वास सार्थ ठरवला. श्रेयस अय्यरला २८ धावांवर माघारी पाठवताना त्याने सूर्यासोबतची ६२ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी तोडली. मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने आल्याआल्या फटकेबाजीला सुरूवात केली. सूर्यकुमार भारताकडून ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. सुरेश रैना ( १०१),
रोहित शर्मा ( १०६, १००* व १११*), लोकेश राहुल ( १०१*) व दीपक हुडा यांनी शतक झळकावले आहे. डेव्हिड विलीने भारताला पाचवा धक्का देताना कार्तिकला ( ६) बाद केले. त्यानंतर रवींद्र जडेजाला १८व्या षटकात रिचर्ड ग्लीसनने माघारी पाठवले.
भारताला १२ चेंडूंत ४१ धावांची गरज असताना सूर्याने १९व्या षटकात चित्रच बदलले. मोईन अलीच्या त्या षटकात १६ धावा कुटल्यानंतर पाचव्या चेंडूवर सूर्यकुमारचा फटका चुकला अन् फिल सॉल्टने झेल टिपला. सूर्यकुमारने १४ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ५५ चेंडूंत ११७ धावांची वादळी खेळी केली. भारताकडून ट्वेंटी-२०तील ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. रोहितने २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ११८ धावा केल्या होत्या. भारताला अखेरच्या ६ चेंडूंत विजयासाठी २१ धावा हव्या होत्या, परंतु भारताला विजय मिळवता आला नाही. भारताने ९ बाद १९८ धावा केल्या. इंग्लंडने १७ धावांनी सामना जिंकून मालिका १-२ अशी सोडवली.
आजचा सामना जिंकला असता तर रोहित शर्माने कर्णधार म्हणून सलग २० सामने जिंकण्याच्या रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली असती.
जोस बटलर ( १८) व जेसन रॉय ( २७) आजही फार कमाल दाखवू शकले नाही. फिल सॉल्ट ( ८) व मोईन अली ( ०) झटपट बाद झाले. मलान व लिव्हिंगस्टोन यांनी ४३ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. मलान ३९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७७ धावांवर बाद झाला. हॅरी ब्रुकने ९ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने १९ धावा कुटल्या. लिव्हिंगस्टोन २९ चेंडूंत ४ षटकांरांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने ७ बाद २१५ धावा केल्या. ख्रिस जॉर्डनने ३ चेंडूंत ११ धावा केल्या. भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील इंग्लंडची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी २००७मध्ये त्यांनी ६ बाद २०० धावा केल्या होत्या.
Web Title: IND vs ENG 3rd T20I Live Updates : Suryakumar Yadav 117 runs from just 55 balls with 14 fours and 6 sixes; England win by 17 runs, but Team India take the series 2-1.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.