लीड्स : ‘इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजवर चेंडू फेकले होते,’ अशी माहिती भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंत याने दिली. ज्या वेळी ही घटना घडली, तेव्हा टीव्ही कॅमेऱ्यामध्ये कर्णधार विराट कोहली काहीसा नाराज दिसला आणि त्याने सिराजला मैदानाबाहेर काहीतरी फेकण्यास सांगितले.पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पंतला याबाबत विचारले असता, तो म्हणाला की, ‘मला वाटते, प्रेक्षकांमधून कोणीतरी सिराजवर चेंडू फेकले होते. त्यामुळे कोहली नाराज झाला होता.
तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते बोलू शकता, पण खेळाडूंवर अशा प्रकारे वस्तू फेकून मारू नका. क्रिकेटसाठी हे चांगले नाही, असे माझे मत आहे.’ या सामन्यातही सीमारेषेजवळ प्रेक्षकांनी शॅम्पेन बॉटल्सचे बूच फेकले होते. त्या वेळी लोकेश राहुल सीमारेषेवर उभा होता. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीमध्येही प्रेक्षकांनी सिराजसाठी अपशब्द वापरले होते.
‘पंचांनी सांगितल्याने स्टान्स बदलला’‘फलंदाजीदरम्यान पंचांनी सांगितल्यामुळे मला स्टान्स (फलंदाजीला उभे राहण्याची पद्धत) बदलावा लागला होता,’ असा दावाही पंतने या वेळी केला. ‘स्विंग चेंडूंचा सामना करण्यासाठी मी क्रीझच्या बाहेर उभा राहिलेलो, पण त्यामुळे डेंजर एरियामध्ये (यष्ट्यांच्या थेट समोर) येत असल्याने तेथे पायांचे निशाण उमटत होते, त्यामुळे पंचांनी स्टान्स बदलण्यास सांगितले होते. पण मी याकडे अधिक लक्ष देत नाही, कारण कोणीही असे केले, तर पंच त्याला ताकीद देणारच,’ असे पंतने म्हटले.