Ind vs Eng Pink Ball Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) यानं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरणाऱ्या इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या डावात कमाल केली. कर्णधार जो रूटनं गोलंदाजीची सूत्र हाती घेताना टीम इंडियाच्या डावाला मोठं भगदाड पाडलं. रूटनं पहिल्या तीन षटकांत एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या. ३ बाद ११४ धावांवरून टीम इंडियाची ८ बाद १२५ अशी घसरगुंडी उडाली. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी थोडा संघर्ष केला, परंतु ते भारताची आघाडी ३३ धावांपर्यंतच नेऊ शकले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ११२ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव १४५ धावांवर गडगडला. रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचे अर्धशतक हीच टीम इंडियासाठी पॉझिटीव्ह गोष्ट ठरली. जो रूटनं पाच विकेट्स घेतल्या. जो रूटनं घेतली टीम इंडियाची 'फिरकी'; ११ धावांत ५ फलंदाज गेले माघारी
पहिल्या दिवसाच्या ३ बाद ९९ धावांवरून टीम इंडियानं आजच्या खेळाला प्रारंभ केला. रोहित चांगल्या फॉर्मात दिसत होता आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या बाजूनं त्याला चांगली साथ देताना दिसला. भारतानं पहिल्या डावात २ धावांची आघाडी घेताच जॅक लिचनं आजच्या दिवसाचा पहिला धक्का दिला. अजिंक्य रहाणेला ( ७) त्यानं पायचीत पकडले. अजिंक्यची बॅट संपर्कात येईलपर्यंत चेंडू अगदी वेगानं वळण घेत पॅडवर आदळला आणि अम्पायरनं बोट वर केलं. त्यानंतर पुढच्याच षटकात लिचनं इंग्लंडला मोठी विकेट मिळवून दिली. रोहित ९६ चेंडूंत ११ चौकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. तोही पायचीत झाला.