IND vs ENG 3rd Test : भारत-इंग्लंड तिसरी कसोटी उद्यापासून राजकोट येथे सुरू होणार आहे. १०-१२ दिवसांच्या ब्रेकनंतर होत असलेल्या या कसोटीत दोन्ही संघांची रणनीती नेमकी काय असेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. लोकेश राहुलने माघार घेतल्याने भारतीय संघात युवा फलंदाजाचे पदार्पण होईल, असा अंदाज आहे. त्यात आज खेळपट्टी पाहून इंग्लंडने मोठा निर्णय घेतला आहे. राजकोटची खेळपट्टी पाटा असल्याने इंग्लंडने जलद मारा करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी आज प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आणि त्यात एक बदल पाहायला मिळाला. हैदराबाद कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत आघाडी घेतली होती, परंतु भारताने विशाखापट्टणम येथे पलटवार केला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत जलदगती गोलंदाज मार्क वूडला परत बोलावले आहे. शोएब बशीर याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कर्णधार बेन स्टोक्स याचा हा १००वा कसोटी सामना असल्याने इंग्लंड त्याला विजयी भेट देण्यासाठी सज्ज आहे.
इंग्लंडचा संघ - ( England Men's XI ) - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड व जेम्स अँडरसन.
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोघांचे पदार्पण ?रजत पाटीदारला दुसऱ्या कसोटीत संधी दिली गेली होती, परंतु त्याला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत यालाही आतापर्यंत संधीचं सोनं करता आलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत युवा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल याला संधी मिळेल अशी चर्चा आहे. सराव सत्रात यष्टींमागे जुरेल दिसला, पहिल्या व दुसऱ्या स्लीपमध्ये सर्फराज खान व यशस्वी जैस्वाल होते, तर गलीमध्ये रजत उभा होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात सर्फराज व जुलेर यांचे पदार्पण पक्के समजले जातेय. रजतला आणखी एका सामन्यात संधी दिली जाईल.
भारताचा अपडेटेड संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल , रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप