IND vs ENG 3rd Test ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला १५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघात विराट कोहलीचे पुनरागमन या मालिकेत तरी अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. BCCI ने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला आणि त्यात विराटचे नाव नव्हते. इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून मिळवलेल्या आघाडीला भारताने दुसऱ्या कसोटीत प्रत्युत्तर दिले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. आता तिसऱ्या कसोटीत कोण बाजी मारतंय याची उत्सुकता आहे, परंतु पाहुण्या इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंडचा सर्वात अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लिच ( Jack Leach) याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांतून माघार घेतली. हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत लिच याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्याला विशाखापट्टणम कसोटीला मुकावे लागले होते. आता तर त्याने संपूर्ण मालिकेतून माघार घेतली आहे आणि इंग्लंडने त्याच्या बदली कोणाला रिप्लेस करायचे नाही, असा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार पुढील २४ तासांत लिच अबु धाबी येथून लंडनसाठी रवाना होईल. दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा संघ अबु धाबी येथे आला होता आणि आता तेही तिसऱ्या कसोटीसाठी लिच याच्याशिवाय राजकोट येथे दाखल होतील. दरम्यान, लिच याच्या दुखापतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे.