IND vs ENG 3rd Test ( Marathi News ) : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट येथील क्रिकेट स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातला तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होतोय... विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीनंतर जवळपास १०-१२ दिवसांनी तिसरी कसोटी होतेय. या विश्रांतीच्या काळात भारतीय संघात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यात तिसऱ्या सामन्याच्या दोन दिवसआधी लोकेश राहुलने ( KL Rahul) पुन्हा एकदा माघार घेतली. त्यामुळे आता प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याची भारतीय चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे या संपूर्ण मालिकेला मुकणार असल्याचे निश्चित झाले आहेत. त्याची रिप्लेसमेंट म्हणून रजत पाटीदार याला आधीच संघात सहभागी करून घेतले होते. लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या कसोटीतून दुखापतीतून माघार घेतल्यानंतर सर्फराज खान याला संधी मिळाली, परंतु त्याचे पदार्पण अद्याप झालेले नाही. काल लोकेशने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतल्यावर देवदत्त पडिक्कलची संघात निवड झाली. पण, आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार हे चित्र अस्पष्ट होतं. आज सराव सत्रात तिसऱ्या कसोटीत कोण कोण खेळेल हे चित्र समोर आलं आहे.
रजतला दुसऱ्या कसोटीत संधी दिली गेली होती, परंतु त्याला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत यालाही आतापर्यंत संधीचं सोनं करता आलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत युवा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल याला संधी मिळेल अशी चर्चा आहे. रजतच्या जागी सर्फराज खान पदार्पण करेल असेही म्हटले जातेय. सराव सत्रात या सर्व चर्चांची उत्तर मिळाली आहेत. सराव सत्रात यष्टींमागे जुरेल दिसला, पहिल्या व दुसऱ्या स्लीपमध्ये सर्फराज खान व यशस्वी जैस्वाल होते, तर गलीमध्ये रजत उभा होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात सर्फराज व जुलेर यांचे पदार्पण पक्के समजले जातेय. रजतला आणखी एका सामन्यात संधी दिली जाईल.
भारताची प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, मोहम्मद सिराज
भारताचा अपडेटेड संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल , रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप