IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi | राजकोट: रवींद्र जडेजाच्या एका चुकीमुळे पदार्पणवीर सर्फराज खानच्या स्फोटक खेळीचा अंत झाला. सर्फराज बाद होताच कर्णधार रोहित शर्मा देखील संतापल्याचे दिसले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सर्फराज खान यांनी तिसऱ्या सामन्यातील पहिला दिवस गाजवला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहितने शतकी खेळी करून डाव सावरला. त्याला जड्डूनेही चांगली साथ दिली अन् शतक झळकावून तो नाबाद परतला. हिटमॅनला बाद करण्यात मार्क वुडला यश आले. पण, त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या सर्फराज खानने छोटा पॅकेट बडा धमाका केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ८६ षटकांत ५ बाद ३२६ धावा केल्या.
आज रोहितने १९६ चेंडूत १३१ धावांची शानदार खेळी केली. मार्क वुडने भारतीय कर्णधाराला बाद करून यजमान संघाला चौथा धक्का दिला. पण जडेजाने त्याचा अप्रतिम खेळ सुरूच ठेवला. जड्डूने देखील शतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. जडेजाने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले, त्याला सर्फराज खानने चांगली साथ दिली.
जडेजाने दिली प्रामाणिक कबुली
पदार्पणवीर सर्फराजने स्फोटक खेळी करताना अर्धशतक झळकावले पण जडेजाच्या एका चुकीमुळे सर्फराजला बाद व्हावे लागले. खरं तर झाले असे की जड्डू ९९ धावांवर खेळत असताना त्याने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून चूक झाली अन् सर्फराजला धावबाद व्हावे लागले. जडेजाने धाव घेण्याच्या इराद्याने दुसऱ्या टोकाला असलेल्या सर्फराजला कॉल दिला पण मार्क वुडने सर्फराजला धावबाद करण्यात कोणतीच चूक केली नाही. सर्फराजने १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६६ चेंडूत ६२ धावा केल्या. जडेजाने १९८ चेंडूत १०० धावांची शतकी खेळी केली.
दरम्यान, आपल्या चुकीमुळे सर्फराज बाद झाल्याची प्रामाणिक कबुली रवींद्र जडेजाने दिली. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत म्हटले की, सर्फराज खानसाठी वाईट वाटते... तो माझा चुकीचा कॉल होता... पण खूप चांगला खेळलास.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज.
Web Title: IND vs ENG 3rd Test Live Feeling bad for Sarfaraz Khan Ravindra Jadeja apologies for run-out, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.