Sunil Gavaskar on Team India, IND vs ENG: यजमान भारतीय संघाने कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडविरूद्ध दमदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४४५ धावा केल्या तर इंग्लंडने प्रत्युत्तरात ३१९ धावा केल्या. पहिल्या डावातील भक्कम आघाडी पुढे वाढवताना दुसऱ्या डावात भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ४३० धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर ५५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण डाव १२२ धावांवर आटोपला आणि त्यांचा तब्बल ४३४ धावांनी पराभव झाला. टीम इंडियाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. तरीही भारतीय खेळाडूंच्या एका कृतीमुळे सुनील गावसकर काहीसे नाराज झाल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखवली.
गावसकर नाराज का झाले? नक्की काय घडले?
सामन्याचा पहिला दिवस नेहमीप्रमाणे खेळण्यात आला. दुसऱ्या दिवशी मात्र भारतीय खेळाडू दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरले. काही दिवसांपूर्वी भारताचे सर्वात वयस्क कसोटीपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले होते. त्यांच्या कार्याला सलाम आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून दुसऱ्या दिवशी खेळाडूंनी काळी फित बांधली. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली. परंतु भारतीय खेळाडूंनी सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना आदरांजली व्यक्त करायला हवी होती, अशा शब्दांत गावसकरांनी नाराजी व्यक्त केली. तरीही दुसऱ्या दिवशी ही कृती करून गायकवाड यांना श्रद्धांजली व्यक्त केल्याने, त्यांनी काही अंशी समाधानही व्यक्त केले.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (डीके) यांचे सोमवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. दत्ताजीराव यांनी ११ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या १९५९ सालच्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी होती. दत्ताजीराव गायकवाड हे भारताचे सर्वात वयस्क आंतरराष्ट्रीय कसोटीपटू होते. १९५२ ते १९६१ या कालावधीत त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. १९५२ मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध सलामीवीर म्हणून पदार्पण केले. मधल्या फळीत जेव्हा त्यांना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी उपयुक्तता दाखवून दिली. १९५३ चा वेस्ट इंडिज आणि १९५९च्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांना संधी मिळाली. पाकिस्तानविरुद्ध १९५२-५३ व वेस्ट इंडिजविरुद्ध १९५८-५९च्या घरच्या मैदानावरील मालिकेतही ते खेळले. १९५९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर खेळला, परंतु त्यात पाचही कसोटी भारताने गमावल्या. त्यानंतर त्यांना फारशी चमक दाखवता आली नाही.