IND vs ENG 3rd Test Live Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोटमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने मोठी कामगिरी केली. अश्विनने जॅक क्रॉलीला आपला बळी बनवताच त्याने कसोटी क्रिकेटमधील ५०० बळी पूर्ण केले. (Ashwin 500 Wicket) अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन हा माजी कर्णधार अनिल कुंबळेनंतर ५०० कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. अश्विनच्या या कामगिरीने अवघ्या क्रिकेट विश्वाला आपलेसे केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील अश्विनच्या कामगिरीला दाद दिली.
अश्विनने आपल्या तगड्या अनुभवाचा फायदा घेत क्रॉलीला बाद करून इंग्लंडला पहिला झटका दिला. या बळीसह अश्विनने ५०० बळी घेण्याची किमया साधली. अनिल कुंबेळेनंतर सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनचे कौतुक करताना सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "लाखात एक असलेल्या गोलंदाजाला ५०० बळी... अश्विन हा एक विजेता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी घेणे ही एक मोठी कामगिरी आहे. खूप खूप शुभेच्छा, चॅम्पियन."
तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने १३०.५ षटकांत सर्वबाद ४४५ धावा केल्या. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी करून मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय पदार्पणवीर सर्फराज खानने ६२ धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून पहिल्या डावात मार्क वुडने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर रेहान अहमद २ आणि जेम्स अँडसरन, टॉम हार्टली, आणि जो रूट यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. दुसऱ्या दिवशी पाहुण्या इंग्लिश संघाने जोरदार प्रत्युत्तर दिले. सलामीवीर बेन डकेटने २ षटकार आणि २१ चौकारांच्या मदतीने ११८ चेंडूत १३३ धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर ३५ षटकांत २ बाद २०७ धावा केल्या आहेत.
आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू -
- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - ८०० बळी
- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - ७०८ बळी
- जेम्स अँडरसन (इंग्लंड) - ६९६ बळी
- अनिल कुंबळे (भारत) - ६१९ बळी
- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - ६०८ बळी
- ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - ५६३ बळी
- कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) - ५१९ बळी
- नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) - ५१७ बळी
- आर अश्विन (भारत) - ५०० बळी
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज.
Web Title: IND vs ENG 3rd Test Live Updates 500 Test wickets for a one-in-a-million bowler says sachin tendulkar on r ashwin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.