ind vs eng 3rd test live updates cricket match score : हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने सुरूवातच दणक्यात केली आहे. भारताचा निम्मा संघ ५८ धावांत माघारी परत पाठवून इंग्लंडनं सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागूनही विराट कोहलीनं प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला अन् तो अंगलट आला. जेम्स अँडरसननं पहिल्याच स्पेलमध्ये लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट यांना बाद केले. त्यानंतर ऑली रॉबिन्सननं अजिंक्य रहाणे व रिषभ पंत यांची विकेट घेतली. विराटच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आणखी लांबली. मागील ५० आंतरराष्ट्रीय डावांत विराटला शतकावीनाच रहावे लागले आहे. विराटचे हे अपयश पाहून महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या कर्णधाराला सल्ला दिला.
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी जेम्स अँडरसननं विराटला ७ धावांवर बाद केले. २३ कसोटींत अँडरसननं सातवेळा विराटची विकेट घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉन यानं सर्वाधिक ७ वेळाच विराटची विकेट घेतली आहे. इंग्लंड दौऱ्यातील मागील चार डावांत विराटनं एक अर्धशतक झळकावले आहे. विराटनं महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असा सल्ला गावस्करांनी दिला. ते म्हणाले,''त्यानं लगेच सचिन तेंडुलकरला कॉल करायला हवा आणि काय करता येईल, हे विचारायला हवं. २००४मध्ये सिडनीत जे सचिननं केलं, तेच विराट करू शकतो. ''
''विराट कोहलीचा फॉर्म हा माझ्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. कारण, तो पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्टम्प्सवर जाणाऱ्या चेंडूवर बाद होत आहे. २०१४मध्ये तो ऑफ स्टम्प्सवरच बाद होत होता,''असे गावस्कर म्हणाला. २००३-०४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तेंडुलकरनं सिडनी कसोटीत ४३६ चेंडूंचा सामना करताना ६१३ मिनिटांच्या खेळात नाबाद २४१ धावा केल्या होत्या. भारतानं ७ बाद ७०५ धावांवर डाव घोषित केला, परंतु ऑस्ट्रेलियानं हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं.
Web Title: IND vs ENG 3rd Test LIVE Updates Full Score Card : Call Sachin Tendulkar And Ask For His Help: Sunil Gavaskar to Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.