Join us  

IND vs ENG Live: ३ गडी स्वस्तात बाद पण 'हिटमॅन' खंबीर! 'शतकवीर' रोहितनं भारताला सावरलं

IND vs ENG 3rd Test Live: आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 2:38 PM

Open in App

IND vs ENG 3rd Test Live Updates In  Marathi | राजकोट: कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर रवींद्र जडेजाला २० व्या षटकाच्या आतच खेळपट्टीवर यावे लागले. यशस्वी जैस्वाल (१०), रजत पाटीदार (५) आणि शुबमन गिल (०) स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोर्चा सांभाळला. आजच्या सामन्यात भारतीय संघ काही युवा खेळाडूंसह मैदानात आहे. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे. खरं तर ३३ धावांवर ३ गडी तंबूत परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली. रवींद्र जडेजाने हिटमॅनला मोलाची साथ दिली. 

संघ अडचणीत असताना रोहितने तगड्या अनुभवाचा फायदा घेत पाहुण्या इंग्लिश संघाला प्रत्युत्तर दिले. रोहित शर्मा टी लंचपर्यंत ९७ धावांवर नाबाद राहिला. मग पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर त्याने दोन धावा काढल्या. त्यानंतरचा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर २ धावा काढून भारतीय कर्णधाराने कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक पूर्ण केले. आपल्या मायदेशात रोहितने हे नववे शतक झळकावले. त्याने १५७ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. हिटमॅनने या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार लगावले. इंग्लंडविरूद्ध तिसरे शतक झळकावण्यात भारतीय कर्णधाराला यश आले. भारताने ५५.२ षटकांपर्यंत ३ बाद १९६ धावा केल्या आहेत. 

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. सर्फराज व जुरेल यांचे पदार्पण झाले आहेत. मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे. मुकेश कुमार व अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. 

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज. 

तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड व जेम्स अँडरसन.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मारवींद्र जडेजा