IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi | राजकोट: तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. इंग्लिश संघाला ३१९ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने मजबूत पकड बनवली. खरं तर दुसऱ्या दिवसअखेर पाहुण्या इंग्लंडने ३५ षटकांत २ बाद २०७ धावा केल्या होत्या. पण तिसरा दिवस इंग्लंडसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. बेन स्टोक्सच्या संघाला ३१९ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने १२६ धावांची आघाडी घेतली होती. त्यात यशस्वी-शुबमनच्या खेळीने आणखी भर पडली.
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी या आघाडीत आणखी वाढ केली. भारतीय कर्णधार रोहितला (१९) दुसऱ्या डावात काही खास करता आले नाही. पण, सलामीवीर यशस्वी जैस्वालने झंझावाती शतकी खेळी केली, त्याला शुबमन गिलने चांगली साथ दिली. जैस्वालने ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १३३ चेंडूत १०४ धावा केल्या. पाठीची दुखापत वाढू लागल्याने यशस्वी रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. म्हणजेच तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रजत पाटीदारला (०) स्वस्तात माघारी जावे लागले. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर ५१ षटकांत २ बाद १९६ धावा केल्या असून ३२२ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. शुबमन गिल (६५) आणि कुलदीप यादव (३) नाबाद परतले आहेत.
इंग्लंडचा पहिला डावभारताने ४४५ धावांचा डोंगर उभारल्यानंतर पाहुणा इंग्लिश संघाव दबावात आला. पण, बेन डकेटने यजमानांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याने १५१ चेंडूत १५३ धावांची मोठी खेळी केली. याशिवाय ओली पोप (३९) आणि कर्णधार बेन स्टोक्सने (४१) धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लिश संघ मजबूत स्थितीत होता. पण तिसऱ्या दिवशी यजमानांनी पुनरागमन केले. अखेर इंग्लंड आपल्या पहिल्या डावात ७१.१ षटकांत ३१९ धावांत सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर कुलदीप यादव (२) आणि रवींद्र जडेजा (२) तसेच जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज.
तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड व जेम्स अँडरसन.