आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाच सामन्यांची मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा १०० वा कसोटी सामना आहे. आजच्या सामन्यातून भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांनी पदार्पण केले आहे. इंग्लंडने फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या जागी मार्क वुडचा संघात समावेश केला आहे.
भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेने पदार्पणाची कॅप सर्फराज खानला दिली. यासह सर्फराजने टीम इंडियाचा स्टार शुबमन गिलचा एक खास विक्रम मोडला. खरं तर शुबमन गिलने पदार्पण केले तेव्हा २३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याची सरासरी ६८.७८ होती, तर सर्फराजची सरासरी त्याच्यापेक्षा चांगली आहे. सर्फराजने ४५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ४९०० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये एका त्रिशतकासह १४ शतकांचा समावेश आहे.
कसोटी पदार्पण अन् सर्वोच्च सरासरी
- विनोद कांबळी: २७ सामन्यात ८८.३७ ची सरासरी
- प्रवीण अमरे: २३ सामन्यात ८१.२३ ची सरासरी
- यशस्वी जैस्वाल: १५ सामन्यात ८०.२१ ची सरासरी
- रशियन मोदी: ३८ सामन्यांमध्ये ७१.२८ ची सरासरी
- सचिन तेंडुलकर: ९ सामन्यात ७०.१८ ची सरासरी
- सर्फराज खान : ४५ सामन्यात ६९.८५ ची सरासरी
- शुभमन गिल : २३ सामन्यात ६८.७८ ची सरासरी
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आऱ अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज.
तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड व जेम्स अँडरसन.