Join us  

सर्फराज खानला संधी नाहीच! तिसऱ्या कसोटीत २३ वर्षीय खेळाडू करणार पदार्पण

भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 11:01 AM

Open in App

India vs England 3rd Test ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवली जाणार आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे दमदार पुनरागमन केले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. स्टार फलंदाज विराट कोहली उर्वरित तीन कसोटीत खेळणार की नाही, याची उत्सुकताही आता संपली आहे. कारण, बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात विराटचे नावच नाही. लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांचे तिसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघंही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळले नव्हते, तर श्रेयस अय्यरला दुखापतीचं कारण सांगून उर्वरित तीन कसोटीतून संघातून वगळले आहे.

IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का, प्रमुख गोलंदाजाची कसोटी मालिकेतूनच माघार

राजकोट येथे होणाऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये आता कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे. रजत पाटीदारला दुसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी दिली होती, परंतु त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. सर्फराज खानची निवड संघात केली गेलीय, परंतु त्याला संधी मिळालेली नाही. तिसऱ्या कसोटीतही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ३० वर्षीय केएस भरतला पहिल्या दोन कसोटीत फार प्रभाव पाडता न आल्याने तिसऱ्या कसोटीत विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी २३ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुराल याला पदार्पणाची संधी मिळणार आहे. लोकेशच्या येण्याने सर्फराजला पुन्हा एकदा प्रतीक्षा पाहावी लागेल.

''भरतची फलंदाजी फार काही चांगली झालेली नाही, तसेच त्याचे यष्टिरक्षक फार असे ग्रेट नव्हते. त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. दुसरीकडे जुरलकडे प्रतीभ आहे आणि त्याने उत्तर प्रदेश, भारत अ आणि राजस्थान रॉयल्सकडून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे राजकोट कसोटीत त्याला पदार्पणाची संधी मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही,''असे सूत्रांनी सांगितले.  जसप्रीत बुमराहाला चौथ्या कसोटीत विश्रांती दिली जाईल असाही अंदाज आहे. 

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतात संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप    

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयलोकेश राहुल