India vs England 3rd Test ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरी कसोटी उद्यापासून सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. पहिल्या कसोटीत हार झाल्यानंतर भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळेच तिसऱ्या कसोटीत बाजी मारून आता आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ कंबर कसून मैदानावर उतरणार आहेत. पण, भारतीय संघासमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत.. विराट कोहलीने या संपूर्ण मालिकेतून माघार घेतल्यानंतर लोकेश राहुलही तिसऱ्या कसोटीतून मागे हटला आहे. त्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे आणि सराव सत्रातही तो अडखळताना दिसला...
ठरलं...! 'या' फोटोवरून टीम इंडियाच्या Playing XI चं चित्र स्पष्ट झालं; दोघांचं पदार्पणही पक्कं
रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत काही खास कामगिरी करता आलेली नाही. दोन कसोटीत २४, ३९, १४ व १३ अशा धावा त्याने केल्या आहेत. विराट व लोकेश यांच्या अनुपस्थितीत रोहितच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. यशस्वी जैस्वालने मागील कसोटीत द्विशतक झळकावले, तर शुबमन गिलनेही शतकी खेळी केली. त्यामुळे आता रोहितला आपला फॉर्म दाखवावा लागणार आहे. कारण, गिल व यशस्वी वगळल्यास रजत पाटीदार, सर्फराज खान व ध्रुव जुरेल यांच्याकडे कसोटीचा अनुभव नाही.
मात्र, काल पार पडलेल्या सराव सत्रात रोहित अडखळताना दिसला. नेट बॉलरने त्याला इनस्विंगवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर रोहितने थोडा आराम केला आणि पुन्हा सरावासाठी आला. पण, त्याला अपेक्षित सूर गवसलेला दिसला नाही. उलट त्या गोलंदाजाने रोहितला पुन्हा बाद केले. रोहितने खेळपट्टीवर दोन्ही बाजूने फलंदाजी केली, परंतु त्याचे बाद होण्याचे सत्र कायम राहिले. नेट सरावातील या अपयशावरून प्रत्यक्ष लढतीत त्याच्या कामगिरीवर चर्चा करणे चुकीचे असले तरी त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय नक्कीच आहे.
भारताचा अपडेटेड संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल , रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप