India vs England 4rth Test ( Marathi News ) : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी भारत व इंग्लंडचे खेळाडू चार्टर्ड फ्लाईटने रांची येथे नुकतेच दाखल झाले आहेत. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप असे बरेच भारतीय खेळाडू रांची विमानतळावरून बाहेर येताना दिसले. पण, प्रमुख खेळाडू शेवटपर्यंत न दिसल्याने चाहत्यांची धाकधुक वाढली आहे.
पहिल्या कसोटीतील पराभवानतंर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. आता चौथ्या कसोटीत भारतीय संघात काही बदल पाहायला मिळणार आहेत. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते, तर लोकेश राहुल पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. राहुलला दुखापत झाल्याने तो तिसरी कसोटी खेळेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. अशा स्थितीत तो रांची कसोटीत उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
भारतीय संघ मंगळवारी रांची येथे दाखल झाला, परंतु बुमराह संघासोबत दिसला नाही. तो तिथून अहमदाबादला गेल्याची सांगण्यात येत आहे. वर्क लोड लक्षात घेता बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असल्याची चर्चा आहे. बुमराह या मालिकेत सर्वाधिक १७ विकेट्स घेणारा गोलंदाज आहे आणि त्याने तीन सामन्यांत ८०.५ षटकं फेकली आहेत. त्यामुळे पाचव्या कसोटीपूर्वी त्याला विश्रांती दिली जाणार आहे. मोहम्मद सिराजलाही दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली गेली होती. तिसऱ्या कसोटीपूर्वी मुकेश कुमारला रणजी करंडक स्पर्धेचा सामना खेळण्यासाठी रिलीज केले गेले होते आणि तो रांची येथे टीम इंडियाच्या ताफ्यात पुन्हा दाखल झाला.
भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल , रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप